मैदानाचा मार्ग मोकळा

By admin | Published: April 24, 2017 02:43 AM2017-04-24T02:43:20+5:302017-04-24T02:43:20+5:30

शहर-उपनगरात मैदान आणि उद्यानांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे, शिवाय अस्तित्वात असणाऱ्या मैदान आणि उद्यानांना अतिक्रमणाचा विळखा

Flee the ground | मैदानाचा मार्ग मोकळा

मैदानाचा मार्ग मोकळा

Next

मुंबई : शहर-उपनगरात मैदान आणि उद्यानांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे, शिवाय अस्तित्वात असणाऱ्या मैदान आणि उद्यानांना अतिक्रमणाचा विळखा बसला आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्टीत लहानग्यांना खेळण्यासाठी जागा नसल्याने, हा मैदान व उद्यानांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतेच पश्चिम उपनगरातील ओशिवरा गावठाणातील खेळाच्या मैदानाकरिता आरक्षित जागेवरील १४ हजार चौरस मीटरचे अतिक्रमण पालिकेने हटविले आहे. त्यामुळे आता येथील भूखंडावर खेळाच्या मैदानाचा मार्ग मोकळा झाला आहे.
जोगेश्वरी येथील ‘के’ पश्चिम विभागातील ओशिवरा गावठाणात खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या ११ हजार चौरस मीटर व ३ हजार चौरस मीटर या जवळजवळ असलेल्या दोन भूखंडांवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण होते. या परिमंडळाचे उपायुक्त किरण आचरेकर यांनी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड व त्यांच्या सहा. उद्यान अधीक्षक जे. एम. भोईर, कनिष्ठ अभियंता प्रवीण पतके व इतर सहकाऱ्यांनी ही अतिक्रमण हटविण्याची कारवाई हाती घेतली. या कारवाईत त्यांनी ४४ अनधिकृत बांधकामे तोडली व हे मैदान अतिक्रमणमुक्त केले. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी तेथे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. या १४ हजार चौरस मीटर म्हणजे, तब्बल १ लाख ४५ हजार चौरस फूट असलेल्या भूखंडावर मैदान विकसित करण्याचा प्रस्ताव लवकरच वरिष्ठांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येईल, असेही प्रशांत गायकवाड यांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे, ‘एम पूर्व’ विभागात गोवंडीतील रफीनगर नाल्याच्या पात्रात झोपड्यांची अतिक्रमणे उद्भवल्याने, या ठिकाणी नाल्याच्या रुंदीकरणाचे काम गेली ८ वर्षे प्रलंबित होते. या ठिकाणी असणाऱ्या ७७ झोपड्या पालिकेद्वारे करण्यात आलेल्या धडक कारवाईदरम्यान तोडण्यात आल्याने, आता या ठिकाणी नाल्याच्या रुंदीकरणास वेग येणार आहे, अशी माहिती ‘एम पूर्व’ विभागाचे सहायक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली आहे.
या कारवाईमुळे नाल्याच्या रुंदीकरणाच्या कामांना गती प्राप्त होणार आहे, ज्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत या परिसरातील अहिल्याबाई होळकर मार्ग, ९० फुटी मार्ग व शिवाजीनगर बेस्ट बस डेपो आदी परिसरात पाण्याचा निचरा अधिक वेगाने होण्यास मदत होऊन, वाहतूक सुरळीत होण्यासदेखील मदत होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Flee the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.