खाडी परिसरात होतेय फ्लेमिंगोंची शिकार
By admin | Published: May 8, 2017 06:53 AM2017-05-08T06:53:30+5:302017-05-08T06:53:30+5:30
मुंबईसह नवी मुंबई आणि ठाणे खाडीलगतच्या परिसरांत फ्लेमिंगो या पाहुण्या पक्ष्यांची शिकार होत असल्याची धक्कादायक बाब समोर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह नवी मुंबई आणि ठाणे खाडीलगतच्या परिसरांत फ्लेमिंगो या पाहुण्या पक्ष्यांची शिकार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिकारींच्या हातातून निसटलेल्या दोनपैकी एका फ्लेमिंगोचा परळच्या पशू
वैद्यकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर एका फ्लेमिंगोवर उपचार सुरू असून आणखी १५ दिवसांत तो उडू शकेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
पायाला दगड लागलेल्या एका फ्लेमिंगोचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब परळ येथील पशू वैद्यकीय रुग्णालयाचे डॉक्टर के.सी. खन्ना यांनी सांगितले. खन्ना म्हणाले की, काहीच दिवसांपूर्वी ऐरोली येथील एका पक्षिमित्राने जखमी फ्लेमिंगोला रुग्णालयात दाखल केले होते. त्या फ्लेमिंगोला दगड मारल्याने पायाला गँगरिन झाले होते. परिणामी, फ्लेमिंगोचा एक पाय उपचारादरम्यान काढावा लागला. मात्र तरीही त्याचा जीव वाचवता आला नाही.
ऐरोली येथील फ्लेमिंगोच्या मृत्यूची घटना ताजी असताना शिवडी खाडीलगत आणखी एक जखमी फ्लेमिंगो सापडला.
मादी जातीच्या या फ्लेमिंगोला एका पक्षिमित्राने रुग्णालयात उपचारासाठी आणले. एक वर्षाच्या या मादी फ्लेमिंगोच्या पंखाला दगड मारल्याचे स्पष्ट होत आहे. आणखी १५ ते २० दिवस उपचारानंतर तो उडू शकेल, अशी शक्यताही खन्ना यांनी व्यक्त केली आहे. या वर्षी तीन फ्लेमिंगो पक्षी हे उपचारासाठी आले असून त्यांना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची शंका खन्ना यांनी व्यक्त केली आहे.
परिणामी खाडीलगत येणाऱ्या या स्थलांतरित पक्ष्यांची शिकार होत असल्याचे प्रथमदर्शनी समजते. त्यामुळे वन खात्याने या बाबीकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज पक्षिमित्रांमधून व्यक्त केली जात आहे. फ्लेमिंगो पक्ष्याचे मांस चविष्ट नसल्याचे जाणकार सांगतात.
तरीही केवळ प्रतिष्ठेसाठी या पक्ष्यांची शिकार होत असून त्यावर वनखात्याने करडी नजर ठेवण्याची मागणीही पक्षिमित्रांनी केली आहे.