लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : परदेशातून गुजरात, मुंबईसह महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या संरक्षणासह संवर्धनासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे मुंबईत सहा फ्लेमिंगोंना सॅटेलाइट करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे फ्लेमिंगोंचा ठावठिकाणा, त्यांचे मार्ग कळण्यासह अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.
जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाचे औचित्य साधत फ्लेमिंगोंच्या सॅटलाइट टॅगिंगची माहिती देताना बीएनएचएसने सांगितले की, फ्लेमिंगोच्या स्थलांतराचे रहस्य उलगडण्यासाठी रिंगिंग आणि सॅटेलाइट टेलिमेट्री अभ्यासाची आवश्यकता होती. बीएनएचएसने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा भाग म्हणून ठाणे खाडीतील लेसर आणि ग्रेटर फ्लेमिंगोचे स्थलांतर आणि अधिवास वापराचे नमुने समजून घेण्यासाठी व्यवस्थापन कृती सुचवण्यासाठी उपग्रह टेलिमेट्री अभ्यास सुरू केला. त्यानुसार, शास्त्रज्ञांनी जानेवारी ते एप्रिल २०२२ या कालावधीत सहा फ्लेमिंगोंना सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणाद्वारे सॅटेलाइट टॅगिंग केले.
टॅगिंग केलेले परिसरभांडूप पंपिंग स्टेशन येथे दोन तर टेनिंग शिप चाणक्य (नवी मुंबई पामबीच राेड) येथे चार फ्लेमिंगोंना सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आले आहे. संस्थेतर्फे स्थलांतरित पक्ष्यांचा अभ्यास केला जात आहे. तामिळनाडू येथील पॉइंट कॅलिमेरे येथे या विषयासंबंधीचे कायमस्वरुपी केंद्र असून, आजमितीस २० राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील बर्ड रिंगिंग आणि टेलिमेट्री अभ्यासाद्वारे स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण केले जाते. जगात फ्लेमिंगोच्या सहा प्रजाती ज्ञात आहेत. त्यापैकी दोन प्रजाती म्हणजे लेसर आणि ग्रेटर फ्लेमिंगो भारतात आढळतात. भारतीय उपखंडातील फ्लेमिंगोचे प्रजनन आणि स्थलांतर हे २० व्या शतकापासून एक रहस्य आहे. फ्लेमिंगोच्या प्रजननावर अभ्यास सुरू आहे. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात सुमारे २.५ लाख स्थलांतरित पक्षी आढळतात. यात फ्लेमिंगोंचादेखील समावेश आहे. शिवडी येथेही फ्लेमिंगोचे वास्तव्य आढळते. सप्टेंबर ते मे या कालावधीत सुमारे १.३ लाख फ्लेमिंगो ठाणे खाडीला भेट देतात.
गेल्या ९५ वर्षांत बीएनएचएसने सात लाखांहून अधिक पक्षी रिंग केले आहेत. त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी १५ पक्ष्यांच्या प्रजातींवर १७५ उपग्रह ट्रान्समीटर तैनात केले आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये १८ हजारांहून अधिक पक्ष्यांना रिंगिंग करण्यात आले आहे. - डॉ. बिवाश पांडव, संचालक, बीएनएचएसफ्लेमिंगोंचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, त्यांचा मार्ग कळावा, याद्वारे अधिकाधिक माहिती गोळा व्हावी, यासाठी फ्लेमिंगोंना सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आले आहे. - राहुल खोत, उपसंचालक, बीएनएचएस