महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 07:02 AM2020-09-28T07:02:18+5:302020-09-28T07:03:02+5:30

फडणवीस-राऊत भेटीचे पडसाद : वर्षा बंगल्यावर खलबते

Flexible in the Mahavikas front; sharad Pawar, Thorat met the Chief Minister | महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले

महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले

Next

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यातील शनिवारच्या ‘लंच पे चर्चा’वरून महाविकास आघाडीत चलबिचल सुरू झाली आहे. रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.

पंचतारांकित हॉटेलात फडणवीस आणि राऊत यांच्यात शनिवारी चर्चा झाली. ही दोन तासाची ही भेट केवळ मुलाखतीसाठी होती असा खुलासा दोन्ही बाजूंनी केला. मात्र, या भेटीमुळे नव्याने राजकीय समीकरणांची मांडणी होणार का, शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा जवळीकीचे प्रयत्न सुरू आहेत का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. पवार यांनीही फडणवीस-राऊत भेटीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

महत्त्व देण्यास नकार

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस-राऊत यांच्या भेटीला फारसे महत्व देण्याचे नाकारले. तर, शरद पवारांसह मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात अनेक विषयांवर चर्चा होत असते. शरद पवार हे आघाडीचे नेते आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राष्टÑवादी काँग्रेसने देखील पवार-ठाकरे भेट ‘रुटिन’ असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक म्हणाले, गेल्या नऊ महिन्यात मुख्यमंत्री आणि शरद पवार असंख्यवेळा भेटले आहेत. कधी ते मातोश्रीवर गेले, कधी महापौर बंगल्यावर भेट झाली, तर कधी वर्षावर. दर वेळी शरद पवार राज्यातील वेगवेगळ्या कामांचे मुद्दे घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जातात. त्यामुळे त्यात नवीन काही नाही, सरकार व्यवस्थित चालू आहेत, असा दावाही मलिक यांनी केला.

सरकार पडेल तेव्हा बघू - फडणवीस
राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपल्याच ओझ्याने कोसळणार आहे. ते कोसळेल तेव्हा पयार्याबाबत विचार करू. मात्र, आम्हाला सरकार बनविण्याची घाई नाही. शिवसेनेसोबत कसलीही राजकीय चर्चा नाही. राऊत यांच्याशी भेट केवळ मुलाखतीसंदर्भात होती.

कोरोनासह विविध कारणांमुळे राज्यातील सरकारविरोधात नाराजी आहे. लोकांमध्ये इतका आक्रोश असेल याचा अंदाज नव्हता. त्यामुळे 'त्या' भेटीचे टायमिंग चुकल्याचे म्हणता येईल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगितले.

मुख्यमंत्र्यांनाही ‘त्या’ भेटीची कल्पना - राऊत
फडणवीस यांच्यासोबतची ती भेट गुप्त नव्हती. शिवेसेनेत गुप्त बैठका वगैरे होत नाहीत. मुलाखतीबाबत ती भेट होती. त्याचे वेगळे अर्थ काढण्याचे कारण नाही. राजकारणात आम्ही वैयक्तिक शत्रुत्व मानत नाही, असे सांगतानाच या भेटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना होती, असा दावा खा. संजय राऊत यांनी केला.

आदित्यला अडचणीत आणणाऱ्यांसोबत जायचे कशाला?; शिवसेनेतील सूर
ज्या आदित्य ठाकरे यांना भाजप नेत्यांनी अडचणीत आणले, मुख्यमंत्री ठाकरे घरी बसून काम करतात, अशी टीका केली; त्यांच्यासोबत सत्तेत जायचे कशाला, असा सूर शिवसेनेत दिसत आहे. -वृत्त/राज्य

Read in English

Web Title: Flexible in the Mahavikas front; sharad Pawar, Thorat met the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.