Join us

उड्डाणाला उशीर, कपिलच्या संतापाचे झाले ‘टेक ऑफ’, इंडिगो विमानसेवेबद्दल नाराजीचा तीव्र सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 10:43 AM

Indigo Airline : टीव्ही कलाकार कपिल शर्मा इंडिगो विमान कंपनीवर चांगलाच खवळला आहे. याचे कारण म्हणजे, बुधवारी चेन्नईहून तो मुंबईसाठी विमानाने येत होता. मात्र, विमानाचा पायलट ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याने त्याला विमातळावर पोहोचण्यास विलंब झाला

मुंबई -  टीव्ही कलाकार कपिल शर्मा इंडिगो विमान कंपनीवर चांगलाच खवळला आहे. याचे कारण म्हणजे, बुधवारी चेन्नईहून तो मुंबईसाठी विमानाने येत होता. मात्र, विमानाचा पायलट ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याने त्याला विमातळावर पोहोचण्यास विलंब झाला आणि त्यामुळे विमान दोन तासांपेक्षा जास्त काळ खोळंबले. सुरुवातीला विमान कंपनीने काहीच कारण सांगितले नाही. प्रवासी मात्र वाट पाहात तसेच उभे होते. मग कपिलने आपल्या सोशल मीडियावर या ताटकळणाऱ्या तसेच व्हीलचेअरवर विमानाची वाट पाहात बसलेल्या काही प्रवाशांचे व्हिडीओ शेअर करत ही विमान कंपनी खोटारडी असल्याचे थेट भाष्य केले. कपिलने या विमान विलंबाची केलेल्या पोस्टवरील प्रतिक्रियांद्वारे अनेकांनी अनेक विमान कंपन्यांवर टीकेची झोड उठवल्याचे दिसून येते.

झाले काय? कपिल ज्या विमानाने चेन्नईहून मुंबईत परतत होता त्याची वेळ रात्री ८ ची होती. ठरल्या वेळेप्रमाणे प्रवाशांना घेऊन विमान कंपनीची बस विमानाच्या दिशेने रवानाही झाली. मात्र, मध्येच ती बस तब्बल ५० मिनिटे थांबली.  बसमध्ये विमानाचे कर्मचारीही फारसे नव्हते. जे होते त्यांना विलंबाचे कारण माहीत नव्हते.  ज्यावेळी विमानात हे सर्वजण पोहोचले व या विलंबाचे कारण विचारले तर वैमानिक वाहतूक कोंडीत अडकल्याचे कारण सांगण्यात आले. विमानात सर्वजण चढल्यानंतर पुन्हा प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आणि याऐवजी दुसरे विमान तुम्हाला नेणार असल्याचे सांगण्यात आले. सर्व जणांना पुन्हा विमानतळावरील टर्मिनलकडे आणण्यात आले.  संतापलेल्या कपिलने याचा आणखी एक व्हिडीओ शूट करत तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जे विमान मुंबईत रात्री ९:५५ ला उतरणे अपेक्षित होते ते अखेर रात्री १२ वाजून १० मिनिटांनी दाखल झाले.

टॅग्स :कपिल शर्मा इंडिगोमुंबई