लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मातृभाषेतून शिक्षण हा सर्वांचा हक्क आहे. उच्च शिक्षणातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमातील बरीचशी गळती ही अभ्यासक्रम मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेतून नसल्यामुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उच्च शिक्षणातील तंत्रशिक्षण प्रत्येकाला सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावे या दृष्टीने आयआयटी मुंबईच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक गणेश रामकृष्णन आणि त्यांच्या टीमने ‘उडान’ प्रकल्पाची निर्मिती केली आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या महत्त्वाच्या निर्णयावर आधारित अशा आयआयटी मुंबईच्या ‘उडान’ प्रकल्पाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. आभासी पद्धतीने झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. कृष्णस्वामी विजयराघवन उपस्थित होते.
भारतीय संविधानानुसार राज्यातील प्रत्येक राज्य आणि स्थानिक प्राधिकरणाने भाषिक अल्पसंख्यांक गटातील मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक टप्प्यावर मातृभाषेतील शिक्षणासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मागील काही वर्षांमध्ये भारताने तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या साहाय्याने प्रगती केली.
मातृभाषेतून शिक्षण घेणारा मागे राहिला
औद्योगिकीकरण आणि त्यास अनुसरून उद्योगधंदे, शहरीकरणही वाढले. यामध्ये साहजिकच आवश्यक अशी इंग्रजी भाषा आणि ती येणारा समूह यांना जास्त महत्त्व येऊ लागले. यामुळे सामान्य व्यवहार मातृभाषेतून करणारा जवळपास ८० टक्के वर्ग मागेच राहिला गेला. या ८० टक्के वर्गालाही त्या १० ते २० टक्के लोकांच्या सोबतीने आणण्याकरिता इंग्रजीतील शिक्षण मातृभाषेतून, प्रादेशिक भाषेतून देणे आवश्यक होते आणि येथेच उडान प्रकल्पाच्या निर्मितीची सुरुवात झाल्याची माहिती प्रा. गणेश रामकृष्णन यांनी दिली.
द्विभाषिक ओसीआर तंत्रज्ञान आणि पोस्ट एडिटिंग टूल्सची निर्मिती
‘उडान’ प्रकल्प म्हणजे उच्च शिक्षणात तंत्रशिक्षणसाठी उपलब्ध साहित्याचे इंग्रजीतून हिंदी आणि इतर सर्व भारतीय भाषांमध्ये भाषांतर करणारी भाषांतराची परिसंस्था (इकोसिस्टम) आहे. भाषांतर आणि शब्दकोशासाठी आपण अनेक प्रकारचे द्विभाषिक ओसीआर तंत्रज्ञान आणि पोस्ट एडिटिंग टूल्सची निर्मिती केल्याचेही त्यांनी सांगितले. देणगीच्या रूपात या प्रकल्पाला जी काही मदत मिळत आहे त्यामधून पुढील १ वर्षात ५०० अभियांत्रिकी इंग्रजी पुस्तकांचे हिंदीत आणि ३ वर्षांत इतर १५ भारतीय भाषांत भाषांतराचे उद्दिष्ट असल्याचे प्रा. रामकृष्णन यांनी स्पष्ट केले.