Join us

माल्टा ते सिंधुदुर्ग विमानसेवा डिसेंबरपासून सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 4:59 AM

भारत आणि युरोपातील माल्टा देशाचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने महाराष्ट्राने पाऊल टाकले असून डिसेंबरमध्ये माल्टा ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई : भारत आणि युरोपातील माल्टा देशाचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने महाराष्ट्राने पाऊल टाकले असून डिसेंबरमध्ये माल्टा ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच दक्षिण आशियातील सर्वात मोठे डाटा सेंटर सिंधुदुर्गमध्ये उभारण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा गृह व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.माल्टाचे पर्यटन मंत्री मिज्झी आणि माल्टाच्या पंतप्रधान कार्यालयातील सचिव तनिया ब्राऊन यांच्या शिष्टमंडळाने आज सिंधुदुर्गचे पालक मंत्री केसरकर यांची भेट घेतली. माल्टा देशाचे पर्यटन मंत्री कोनरॅड मिज्झी आणि पंतप्रधान कार्यालयातील सचिव तानिया ब्राऊन आदी यावेळी उपस्थित होते.केसरकर यांनी नंतर पत्रकारांना सांगितले की, सिंधुदुर्ग येथे डाटा सेंटर उभारण्यासाठी माल्टा व तेथील स्ट्रिम कास्ट ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी मदत करणारआहे. सिंधुदुर्गमधील स्थानिकांना माहिती तंत्रज्ञान, पर्यटन क्षेत्राविषयीचे शिक्षणही देण्यात येणार आहे.मिज्झी यांनी सांगितले, भारतात पर्यटन, बॉलीवूड, आरोग्य पर्यटन, आदरातिथ्य, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रात गुंतवणूक करण्यास माल्टा देशाचे पंतप्रधान इच्छुक आहेत. याचाच भाग म्हणून येत्या डिसेंबरमध्ये माल्टामध्ये भारतीय चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र राज्याबरोबर मनुष्यबळ विकास, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आदी क्षेत्रासाठी सहकार्य करण्यात येणार आहे.