आरेतील नवसाचा पाडा अखेर उजळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 02:10 AM2019-06-04T02:10:43+5:302019-06-04T02:10:54+5:30

मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाने दिले अखेर ना हरकत प्रमाणपत्र

The in-flight pawn will finally be lit | आरेतील नवसाचा पाडा अखेर उजळणार

आरेतील नवसाचा पाडा अखेर उजळणार

Next

मनोहर कुंभेजकर 

मुंबई : स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतर आरेच्या नवसाच्या पाड्याला अखेर वीज मिळणार आहे. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी मालमत्ता अधिकारी यांनी सोमवारी सकाळी नवसाच्या पाड्याला विद्युत व जलजोडणी देण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले. त्या वेळी येथील ८० आदिवासी बांधवांनी बँड वाजवून जल्लोष केला. आता लवकरच वीज व जलजोडणीचे काम सुरू होणार असल्याची माहिती येथील आदिवासी बांधवांनी दिली.

‘लोकमत’ने ‘आरेचे आदिवासी पाडे अंधारात’ असे वृत्त दिले होते. वृत्ताची दखल अखेर मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाला घ्यावी लागली, अशी माहिती नवसाचा आदिवासी पाड्याला वीज व पाणीजोडणी मिळावी म्हणून आदिवासींसाठी काम करणाऱ्या नाझरेथ फाउंडेशन या अशासकीय सेवाभावी संस्थेच्या कसान्ड्रा नाझरेथ यांनी दिली. येथील आदिवासी पाड्यांना वीज मिळावी म्हणून या संस्थेने सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला सोशल मीडियावर नागरिकांचा प्रतिसाद मिळाला होता.

३१ मे रोजी आदिवासी हक्क संवर्धन समिती, मुंबई यांनी येथील आदिवासींना वीजजोडणी व अन्य सुविधा मिळाव्यात म्हणून येथील आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयापासून ते मुंबई पशु वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत आरेच्या २७ आदिवासी पाड्यांतील आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला होता. जर दोन दिवसांत येथील विजेच्या प्रश्नांबाबत ठोस निर्णय मुंबई पशु वैद्यकीय महाविद्यालयाने घेतला नाही, तर गुन्हा दाखल करण्याचा इशारा समितीने दिला होता. याची अखेर त्यांनी दखल घेऊन वीज व जलजोडणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र नवसाच्या पाड्याला दिले, अशी माहिती समितीचे अध्यक्ष दिनेश हाबळे यांनी दिली.

नवसाचा पाडा अंधारात होता. मुंबई व्हेटरनरी कॉलेजसाठी नवसाचा पाडा येथील जागा दिली. मात्र वीज मिळाली नाही. या कॉलेजच्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट आहेत; पण आमच्या नवसाचा पाडा येथील आदिवासींच्या घरात वीज नव्हती, अशी खंत येथील राकेश शिगवण व लखमा दिवाल उंबरसाडे यांनी व्यक्त केली. तसेच येथे ८० आदिवासी बांधव गेल्या १०० वर्षांपासून राहत असून त्यांना पाण्यासाठी एकच नळ आहे. या नळाला आठवड्यातून फक्त एकदाच पाणी येते.

 

Web Title: The in-flight pawn will finally be lit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज