कराडसह धुळ्यात मिळणार विमान उड्डाणाचे प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 02:24 AM2021-05-06T02:24:29+5:302021-05-06T02:24:37+5:30
कराडमध्ये अशा प्रकारचे केंद्र उभारण्यासाठी राजकीय प्रयत्न सुरू होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यासाठी आग्रही होते.
मुंबई : कराड आणि धुळ्यामध्ये आता विमान उड्डाणाचे प्रशिक्षण मिळणार आहे. या दोन्ही ठिकाणी विमान उड्डाण प्रशिक्षण केंद्र उभारण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाने दिली.
कराडमध्ये अशा प्रकारचे केंद्र उभारण्यासाठी राजकीय प्रयत्न सुरू होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यासाठी आग्रही होते. काही महिन्यांपूर्वी ॲम्बिशन फ्लाईंग क्लब व बॉम्बे फ्लाईंग क्लबच्या अधिकाऱ्यांनी कराडमध्ये फ्लाईंग इन्स्टिट्यूट सुरू करण्यासंदर्भात पाहणी केली होती. महाराष्ट्र सरकारने सहकार्य केल्यास उत्तर प्रदेशातील अलिगड मधील केंद्र कराडला स्थलांतरित करण्याची तयारी ॲम्बिशन फ्लाईंग क्लबने दाखविली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आता कराडमध्ये विमान उड्डाण प्रशिक्षण केंद्र उभारण्याची परवानगी मिळाल्याने येत्या काही दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. यानिमित्ताने ग्रामीण भागातील तरुणांना हवाई वाहतूक क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळेल. धुळ्यामध्ये ही असेच केंद्र उभे राहणार असल्याने तेथे प्रशिक्षणास येणारे प्रशिक्षणार्थी, त्यांच्या राहण्याची सुविधा या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळेल, नव्या पायाभूत सुविधा उभ्या राहून परिसराचा कायापालट होईल, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाने दिली.
पायाभूत सुविधांचा विकास
कराड विमानतळाचा वापर मोठ्या प्रमाणात होत नव्हता. आता प्रशिक्षण केंद्रास मान्यता मिळाल्याने पायाभूत सुविधांचा विकास होऊन उत्पन्नाचे स्रोत वाढतील. धुळे येथेही विमान उड्डाण प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मान्यता दिली आहे.
- दीपक कपूर, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरण