Join us

मरीन ड्राइव्हजवळ समुद्रात तरंगते हॉटेल, कॅसिनो, स्विमिंग पूल; कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 8:12 AM

गोव्याच्या धर्तीवर मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी हे ‘फ्लोटेल’ उभारले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आता मरीन ड्राइव्ह जवळील समुद्रात तरंगते हॉटेल (फ्लोटेल) उभारण्यात येणार आहे. रेस्टॉरंट, कसिनो, बार अशा विविध सोयीसुविधांनी युक्त असलेले हे हॉटेल नरिमन पाॅइंटपासून सुमद्रात दोन नॉटीकल मैल अंतरावर क्रुझवर साकारले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) कंत्राटदार नियुक्तीकरिता निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. 

गोव्याच्या धर्तीवर मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी हे ‘फ्लोटेल’ उभारले जाणार आहे. यापूर्वी वांद्रे येथील समुद्रात अशाच पद्धतीचे ‘फ्लोटेल’ उभारण्यात आले होते. मात्र, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू असल्याने या ‘फ्लोटेल’कडे जाणारी जेट्टी बंद करण्यात आली आहे. परिणामी हे ‘फ्लोटेल’ सध्या बंद आहे. आता त्याच धर्तीवर मरीन ड्राइव्हसमोरील समुद्रात ‘फ्लोटेल’ उभारण्याची प्रक्रिया ‘एमएमबी’ने सुरू केली आहे. 

समुद्रातील या ‘फ्लोटेल’वर पर्यटकांना जाता यावे, यासाठी नरिमन पॉइंट येथे ‘एनसीपीए’ जवळ १० हजार चौरस मीटर क्षेत्रावर नव्याने जेट्टी उभारली जाणार आहे. ही जेट्टी आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असेल. तसेच विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांना थेट ‘फ्लोटेल’कडे जाता यावे, यासाठी हॅलिकॉप्टर उतरविता यावे यासाठी हॅलिपॅडची सुविधा असेल. त्याचबरोबर टर्मिनल, कॅन्टीन, स्पीड बोटींना ये-जा करता येण्यासाठी नेव्हीगेशनल चॅनेल, लाटांपासून जेट्टीच्या संरक्षणासाठी ब्रेकवॉटर आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. या ‘फ्लोटेल’साठी सुमारे २४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

दरम्यान, हे ‘फ्लोटेल’ वर्षातील २७५ दिवस सुरू राहील. तर पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत समुद्र खवळलेला असल्याने काही काळ हे ‘फ्लोटेल’ पर्यटकांसाठी बंद असेल. 

चार वर्षांची प्रतीक्षा 

कंत्राटदाराला ‘फ्लोटेल’सह नरिमन पॉइंट येथील जेट्टीची सुविधाही उभारावी लागणार आहे. तसेच त्याचे व्यवस्थापन आणि देखभालही करावी लागेल. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही भाग ‘एमएमबी’ला द्यावा लागणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ‘फ्लोटेल’ प्रत्यक्षात येण्यासाठी जवळपास ४ वर्षांचा कालावधी लागेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

क्रुझ फ्लोटेलवर या सुविधा...

क्रुझवर विविध खाद्यपदार्थांची रेस्टारंट, बार, कसिनो, बँक्वेट हॉल, शॉपिंग मॉल, स्विमिंग पूल, लायब्ररीची सुविधा, नाटके आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी थिएटर

 

टॅग्स :मुंबई