Join us

समुद्रातील तरंगते रेस्टॉरंट बंद; मात्र ऑनलाइन बुकिंग सुरू; ३५ हून अधिक जणांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 9:41 AM

३५ हून अधिक जणांची फसवणूक; वांद्रे पोलिसांकडून तपास.

मुंबई : जवळपास तीन वर्षांपूर्वी वांद्रे समुद्रात बंद झालेल्या तरंगत्या रेस्टॉरंटचे ऑनलाइन बुकिंग घेत हजारोंची फसवणूक करणाऱ्या भामट्याविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित रेस्टॉरंट मालकाने याविरोधात तक्रार दिली असून, अशाप्रकारे ३० ते ३५ जणांची फसवणूक झाल्याचाही संशय त्यांनी व्यक्त केला असून, त्यानुसार तपास सुरू आहे.

चेतन भेंडे (५३) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी २०१६ मध्ये ए. बी. सेलेस्टियल नावाचे हॉटेल वांद्रेवरील सी लिंक परिसरात असलेल्या अरबी समुद्रात शासनाची परवानगी घेऊन सुरू  केले होते. मात्र, कोरोनाच्या काळात म्हणजे २०२१ मध्ये त्यांना ते बंद करावे लागले. जे सुरू करण्याचा प्रयत्न भेंडे करत होते. मात्र, वर्सोवा सी लिंक कोस्टल रोडच्या कामामुळे शासनाने जेट्टी ताब्यात घेतली. त्यामुळे २०२२ मध्येही रेस्टॉरंट सुरू करणे शक्य नाही झाले. 

अनेक कॉल येऊ लागले आणि...  दरम्यान, त्यांना मे २०२३ मध्ये राज रंगानी या व्यक्तीने फोन करत त्यांच्या तरंगत्या रेस्टॉरंटचे बुकिंग केल्याचे कळविले. भेंडे यांनी अधिक चौकशी केल्यावर रंगानी यांनी या रेस्टॉरंटचा नंबर गुगलवरून घेतला होता. जो मनोज शर्मा नावाच्या व्यक्तीने उचलला आणि त्यांच्याकडून बुकिंगच्या नावाखाली क्यू आर कोडवर ५ हजार रुपये स्वीकारले. 

 मात्र, रंगानी ज्यावेळी प्रत्यक्षात त्याठिकाणी गेले, तेव्हा त्या नावाचे किंवा अन्य कोणतेही रेस्टॉरंट त्यांना आढळले नाही. त्यानंतर भेंडे यांना अशाप्रकारचे अनेक कॉल येऊ लागले आणि त्यांच्या बंद झालेल्या हॉटेलसाठी पैसे स्वीकारण्यात येत असल्याचे त्यांना समजले. 

 त्यानुसार या प्रकरणी पोलिसात धाव घेत त्यांनी माहिती दिली. पोलिसांनी पैसे स्वीकारणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :मुंबई