ट्रॅश बूम रोखणार तरंगता कचरा; पूर्व उपनगरात १६ ठिकाणी लवकरच यंत्रणा कार्यान्वित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 12:35 PM2024-10-11T12:35:48+5:302024-10-11T12:36:16+5:30

या पार्श्वभूमीवर पूर्व उपनगराच्या नाल्यांतील तरंगता कचरा काढणे, तो गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ही यंत्रणा वापरली जाणार आहे.

floating trash to curb trash boom the system will soon be implemented in 16 places in the eastern suburbs | ट्रॅश बूम रोखणार तरंगता कचरा; पूर्व उपनगरात १६ ठिकाणी लवकरच यंत्रणा कार्यान्वित करणार

ट्रॅश बूम रोखणार तरंगता कचरा; पूर्व उपनगरात १६ ठिकाणी लवकरच यंत्रणा कार्यान्वित करणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबईतील नदी, नाल्यांमध्ये तरंगणारा कचरा ही पालिकेसमोरील न सुटणारी समस्या आहे. भरतीच्या वेळी समुद्रातून कचरा नाल्यांमध्ये येतो, तर नाल्यांमधील कचराही वाहत समुद्राला जाऊन मिळतो. मुंबईतील नदी, नाल्यांमध्ये वाहणारा कचरा समुद्रामध्ये जाऊ नये, यासाठी 'ट्रॅश बूम'च्या साहाय्याने कचरा गोळा करण्याची पद्धत यशस्वी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व उपनगराच्या नाल्यांतील तरंगता कचरा काढणे, तो गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ही यंत्रणा वापरली जाणार आहे.

पावसाळ्यात अडचणी आल्या असल्या तरी जून २०२५ पर्यंत ही प्रणाली वापरात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. पूर्व उपनगरातील १६ नाल्यांमधील तरंगता कचरा जमा करणे, बाहेर काढणे आदींसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. यासाठी अंदाजे ८८ कोटी खर्च अपेक्षित आहे. मुंबईतील या १६ ठिकाणांपैकी मुख्य म्हणजे मिठी नदीतही 'ट्रॅश बूम'ची संख्या वाढवण्यात येणार आहे.

मुंबईतील नदी, नाल्यांमधील तरंगता कचरा पालिकेसमोरील न सुटणारी समस्या आहे. तरंगता कचरा अडवण्यासाठी पालिकेने पहिल्यांदा २०१८ मध्ये लव्हग्रोव्ह व इर्ला उदंचन केंद्र येथे 'ट्रॅश बूम' बसवले होते. त्यानंतर उपनगरामध्ये गजधरबंध नाला, पेव अव्हेन्यू नाला, मोगरा नाला, ओशिवरा नदी, पोईसर नदी, दहिसर नदी, पाकोला नदी, मिठी नदी (नेचर्स पार्क) व मिठी नदी (बीकेसी ब्रीज) या नऊ ठिकाणी ट्रॅश बूमसह तराफा आरूढ कचरा वाहकप्रणाली २०२२ मध्ये बसविली. अजूनही सर्व प्रणाली योग्य रीतीने सुरू आहेत. याच धर्तीवर नवी कामे देण्यात येणार आहेत.

कशी आहे ट्रॅश बूम यंत्रणा? 

समुद्रकिनारा स्वच्छ राखताना जलप्रदूषण होऊ नये यासाठी पालिकेतर्फे विविध योजना केल्या जातात. त्यामध्ये खारफुटीचे क्षेत्र प्लास्टिकमुक्त राखणे, प्लास्टिकसह त्या पद्धतीचा कचरा समुद्रामध्ये वाहून जाण्यापूर्वी तो संकलित करणे आणि त्याची विल्हेवाट होण्यासाठीही प्रयत्न केले जातात. त्याचा भाग म्हणून पालिकेने ट्रॅश बूम यंत्रणा सुरू केली आहे. या यंत्रणेस सरकते पट्टे जोडल्याने प्रवाहांमधील तरंगता कचरा अडविला गेल्यानंतर हा कचरा बाहेर काढण्याचे काम केले जाते. विदेशामध्ये ट्रॅश बूम किंवा ट्रॅश नेटचा वापर यशस्वी ठरल्यानंतर मुंबई पालिकेनेही ही यंत्रणा राबवण्याचे ठरविले. पालिकेच्या पर्जन्य जलखात्याने मुंबईत एकूण आठ ठिकाणी ही यंत्रणा राबविली आहे.


 

Web Title: floating trash to curb trash boom the system will soon be implemented in 16 places in the eastern suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई