Join us

तरंगता कचरा ठरतोय डोकेदुखी; नाले बंदिस्त करण्याचा मनपाचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 9:44 AM

मुंबई महापालिकेने नाल्यांची सफाई केल्यानंतरही त्यात आजूबाजूच्या झोपडपट्ट्या आणि परिसरातून पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत.

मुंबई : मुंबई महापालिकेने नाल्यांची सफाई केल्यानंतरही त्यात आजूबाजूच्या झोपडपट्ट्या आणि परिसरातून पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे त्याला आळा कसा घालावा, असा यक्षप्रश्न आता पालिकेला सतावत आहे. त्यामुळे नागरिकांनीही नाल्यांमध्ये कचरा न टाकता तो कचरा कुंडीतच टाकावा, जेणेकरून कचरा अडकून नाले तुंबणार नाहीत आणि पाण्याचा जलद निचरा होत राहील, असे आवाहन पालिकेने केले आहे. 

पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्जन्य जलवाहिनी विभाग काम करत आहे. नाल्यातून गाळ आणि कचरा बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

नाल्यांमध्ये येणारा कचरा अडवण्यासाठी छोट्या नाल्यांवर जाळ्या लावता येतील का, अथवा नाले बंदिस्त करता येतील का, तसेच मोठ्या नाल्यांच्या ठिकाणी स्क्रीनिंग किंवा नेटचा पर्याय अवलंबता येईल का, याची चाचपणी पालिका करत आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी जाळ्या बसविल्या असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. 

५४.६८ लाखांचा दंड वसूल-

मोठ्या व छोट्या नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम अंतिम आहे. तरीही काही नाल्यांमध्ये भरतीसोबत तरंगता कचरा जमा झाल्यामुळे नालेसफाई वारंवार करावी लागत आहे. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात निष्काळजी, त्रुटी निदर्शनास आल्याने संबंधित कंत्राटदारांकडून मिळून एकूण ५४ लाख ६८ हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे.

पिशव्या, फर्निचर...

१) नाल्यांतून गाळ तसेच पाण्यावर तरंगणारा कचरा काढला जातो. गाळ काढण्याचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र, सफाई झालेल्या नाल्यांतील पाण्यावर कचरा आढळून येतो. या कचऱ्यात थर्माकोल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॅपर्स आदी वस्तू तरंगत असतात. 

२) घनकचरा व्यवस्थापन विभागासोबत समन्वय साधून हा कचरा नाल्यात येण्यापासून कसा रोखता येईल, या दृष्टीने पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रयत्न सुरू असल्याचे पालिकेने सांगितले.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाकचरा प्रश्न