मुंबई : दुरावलेल्या पालकांच्या शोधात मुंबईत आलेल्या स्वीडनच्या ॲना ग्रॅहन म्हणजेच सीताबाईच्या भावाचा बाल सुधारगृहातील दस्तऐवज (रेकॉर्ड) २००५ साली आलेल्या पुरात वाहून गेल्याचे अधिकाऱ्यांकडून तिला सांगण्यात आले आहे. मात्र, कुटुंबाला शोधण्याची तिची जिद्द कायम असून ती आता मुंबई पोलिसांच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
सीताबाईला १९८० मध्ये काळाचौकी पोलिसांनी ताब्यात घेत मानखुर्द येथील बाल सुधारगृहात ठेवले होते. तेव्हा तिच्यापेक्षा मोठा असलेला भाऊ तिच्यासोबत होता. ॲना मानखुर्द येथील बाल सुधारगृहात असताना तो अधूनमधून तिला भेटायला यायचा असे ॲना सांगते. पुण्यातील दत्तक हक्क परिषदच्या संस्थापक सदस्य ॲड. अंजली पवार सांगतात, मानखुर्द बाल सुधारगृहात ॲनाच्या रेकॉर्डबाबत चौकशी केली असता मुलांचा रेकॉर्ड २००५ च्या पुरात वाहून गेल्याचे सांगण्यात आले.
डोंगरी बाल न्यायालयामार्फत ॲनाला बाल सुधारगृहात पाठवले गेले होते. त्यांच्याकडे तरी हा डेटा उपलब्ध असणे गरजेचे होते. मात्र, तेही पुराचे कारण सांगतात. तसेच, मुलांना ताब्यात घेत असताना नियमानुसार, दाखल करून घेत असताना नोंद केली होती का? त्याबाबतही पोलिसांकडे माहिती मागविण्यात आली असल्याचे ॲड. पवार यांनी सांगितले.
साधायचाय सुखसंवादॲनाच्या आठवणींच्या चौकटीत आता फक्त एकच चित्र आहे, ते म्हणजे टेकडीवरचे झोपडीवजा घर. अंगणात तिचे केस विंचरणारी आई. पायाला जखम झाली म्हणून पाठीवर घेऊन जाणारे बाबा आणि भाऊ. या आठवणींचे गाठोडे सोबत घेऊन आलेल्या ॲनाला आता या चित्रातल्या प्रत्येकाला शोधून काढत त्यांच्याशी सुखसंवाद साधायचाय.