मुंबई : अतिवृष्टीने मुंबई आणि परिसरातील जनजीवन ठप्प झाले असताना पुन्हा एकदा मुंबईकरांनी एकमेकांना सहकार्याचा हात पुढे करत ‘मुंबई स्पिरीट’चे दर्शन घडविले. अनेक संस्था, संघटना, गणेशोत्सव मंडळांच्या जोडीला सामान्य मुंबईकरांनीही आपापल्या क्षमतेनुसार मदतकार्यात सहभाग घेतला. अनेक मुंबईकरांनी फेसबुक, व्हॉटस्अॅप आदी सोशल मिडीयावर स्वत:चा मोबाईल नंबर, घरचा पत्ता देत अडकलेल्या प्रवाशांसाठी स्वत:च्या घराचे दरवाजे उघडे केले.अतिवृष्टीमुळे सायंकाळपर्यंत लोकल आणि बेस्ट बसेसची वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे ओला, उबेर आणि टॅक्सीही निरुपयोगी ठरत होत्या. पावसात अडकून पडलेल्या या मंडळीना मदतीचा हात देण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. सोशल मिडीयावर स्वत:चा पत्ता आणि फोन नंबर टाकून विनसंकोच घरी येण्याचे निमंत्रण दिले. दादर येथील पोर्तुगीज चर्चजवळ राहणारे संतोष पावसकर यांनी फेसबुक तसेच व्हॉटस्अपवर मसेज टाकून आसपास अडकलेल्या लोकांना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. दादर, लोअर परळ, प्रभादेवी, एलफिन्स्टन परिसरातील अनेक कार्यालयांनी अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली. मात्र, आॅफीसबाहेर पडलेली मंडळी पावसातच अडकली.गुरूद्वारासह जैन संघ व मशिदींचा आधारगणेशोत्सव मंडळांसह येथील गुरूद्वारा, मशिद आणि जैन संघांनी महापुरात अडकलेल्या मुंबईकरांसाठी जेवणासह राहण्याची व्यवस्था केली. दादर गुरुद्वारामध्ये लंगरची व्यवस्था केली होती. फोर्ट भागात अडकलेल्या व्यक्तींसाठी सीएसएमटीजवळील बोराबाजार मार्गावर श्री फोर्ट जैन संघामध्ये लोकांच्या जेवणाची व्यवस्था होती.उत्सव मंडपे रिकामी, भाविकांचा पूर ओसरलासतत कोसळणाºया पावसाचा फटका भाविकांनाही बसला. सकाळी उत्साहात भाविक गणपती दर्शनासाठी घरातून बाहेर पडले होते. पण, दुपारपर्यंत पावसाचा वाढता जोर पाहून भाविकांनी घरी परतण्यास पसंती दिली. लालबाग, परळ, दादर भागात पाणी साचायला लागल्याने येथील प्रसिद्ध मंडळांमध्येही भाविकांची गर्दी दुपारनंतर कमी झाल्याचे दिसून आले.परळ येथील तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टच्या गणेशमूर्तीसमोरील सजावटीचा काही भाग दुपारी साडेबाराच्या सुमारास कोसळला. यात हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या मदतीने सजावटीचा कोसळलेला भाग बाजूला करण्यात आल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. मंगळवारी पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने विसर्जनासाठी कसे जायचे? असा प्रश्न अनेक भाविकांना भेडसावत होता. मुसळधार पावसामुळे गणपती विसर्जनासाठी अनेक विघ्न आली. तरीही जमेल तसा भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गणपती विसर्जनासाठी येणाºया भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून मुंबईतील चौपाट्यांवर पोलीस तैनात करण्यात आले होते.पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी विसर्जनसाठी चौपाट्यांवर तसेच कृत्रिम तलावाकडे आलेल्या भाविकांना मदत केली. दुपारी साडेचारच्या सुमारास भरती असल्यामुळे त्यावेळी भाविक विसर्जनासाठी बाहेर पडले नाहीत. त्यानंतर सायंकाळी गणपती विसर्जनासाठी गर्दी होत होती.
भर पावसातही आला माणुसकीला पूर!, पावसाने त्रस्त झालेल्यांना मिळाला आसरा, खाद्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 5:42 AM