Join us

भांडूप जलशुद्धीकरण संकुलाभोवती लवकरच पूरप्रतिबंधक भिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 10:36 PM

भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये शनिवारी रात्री पावसाचे पाणी शिरले. या कारणाने तांत्रिक समस्या उद्भवल्याने येथील विद्युत पुरवठा खंडित करावा लागला. याचा फटका मुंबईतील पाणीपुरवठ्याला बसला.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - भांडुप जलशुद्धीकरण संकुलात दुसऱ्या जलशुध्दीकरण केंद्राचे काम करताना येथील दोन पर्जन्य जलवाहिन्या काढून टाकण्यात आल्या. त्यामुळे डोंगरावरुन येणारे पाणी पर्जन्य जलवाहिनी अभावी संकुलात शिरले. भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी संपूर्ण संकुलभोवती पूर प्रतिबंधक भिंत बांधणे, संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरातून येणारे पुराचे पाणी तुळशी तलावाकडे वळते करण्यासाठी विशेष प्रवाह मार्ग बांधण्यात येणार आहे.

भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये शनिवारी रात्री पावसाचे पाणी शिरले. या कारणाने तांत्रिक समस्या उद्भवल्याने येथील विद्युत पुरवठा खंडित करावा लागला. याचा फटका मुंबईतील पाणीपुरवठ्याला बसला. या संकुलात शिरलेले पावसाचे पाणी युद्ध पातळीवर उपसून गाळणी व उदंचन यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता करून दुरुस्ती करण्‍यात आली. उदंचन करणारे पंप टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने सुरू करण्‍यात आल्यानंतर रविवारी सायंकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.

दरम्यान, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी भांडुप संकुलाची सोमवारी पाहणी केली. पावसाचे पाणी नेमके संकुलात कसे शिरले, संयंत्रे दुरुस्ती करताना प्रत्यक्षात काय अडथळे जाणवले, याबाबतची संपूर्ण माहिती उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोर यांनी यावेळी सादर केली. भांडूप जलशुद्धीकरण संकुलाच्या आतील रचना, बाहेरील परिसर, संयंत्रांची ठिकाणं आदींचे निरीक्षण केल्यानंतर वेलरासू यांनी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. 

अशा आहेत उपाययोजना...

* संकुलाभोवती पूर प्रतिबंधक भिंत उभारणे, संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरातून भांडूप संकुलामध्ये शिरणारे पावसाचे पाणी तुळशी तलावामध्ये वळते करुन पूरस्थिती टाळता यावी यासाठी, विशेष प्रवाह मार्ग, नाला बांधण्याची विनंती अभयारण्याचे संचालक यांच्याकडे करणे.

* संकुलातील मुख्य जलप्रक्रिया इमारतीभोवती पूर प्रतिबंधक भिंत बांधणे आणि संकुल व परिसरातील पर्जन्य जल निःसारण प्रणालीची क्षमता वाढवणे.

* भांडूप जलशुद्धीकरण संकूल हा संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठा असा प्रकल्प आहे. 

* संपूर्ण मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यापैकी सुमारे ६५ टक्के पाण्याचे शुद्धीकरण या एकट्या प्रकल्पामध्ये केले जाते. 

* संकुलातील दोनपैकी एका जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन १,९१० दशलक्ष लीटर तर दुसऱ्या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन ९०० दशलक्ष लीटर आहे.

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटपूर