पारोळ परिसरात पाचव्या दिवशी पूरजन्यस्थिती
By admin | Published: August 1, 2014 03:26 AM2014-08-01T03:26:57+5:302014-08-01T03:26:57+5:30
वसई पूर्व भागात पाच दिवसापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ह्या भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
पारोळ : वसई पूर्व भागात पाच दिवसापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ह्या भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे भातपीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून भात कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वसई पूर्व भागाला गुरुवारी जोरदार पावसाने झोडपल्याने भाताणे, मेढे, शिरवली, तानसा नदीवरील पूल पाण्याखाली असल्याने या भागात आजही १६ गावांचा संपर्क तुटलेला असल्यामुळे या भागातील कामगार, शालेय विद्यार्थ्यांवर नाईलाजाने सुट्टी घेण्याची वेळ आलेली आहे. तसेच या भागातील आजारी नागरिकांचे उपचाराअभावी हाल होत आहेत. आजारांची साथही परिसरात पसरली असून या पावसाने शेतकऱ्यांवरही अवकृपा केल्याचेच दिसून येत आहे. चार- पाच दिवसापासून भातशेती पाण्याखाली गेल्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाची छाया पडू लागली आहे. भातरोपे कुजल्याने भात लावणीसाठी भात रोपे आणायची कुठून, तसेच भात शेतीसाठी लागणारे मजूर, बियाणे, टॅ्रक्टर, खत हे महाग झाले असतानाही शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली पण आता पुरामुळे भातशेती कुजण्याच्या भीतीने शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे. (वार्ताहर)