कोकणातील १८ नद्यांना पूर; विदर्भात अतिवृष्टी, मराठवाड्यात मुसळधार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 08:14 AM2023-07-20T08:14:14+5:302023-07-20T08:14:51+5:30

कोकणात पूरस्थिती, अनेक गावे पाण्यात; मुंबईतही कोसळधारा चाकरमान्यांचे हाल

Flooding of 18 rivers in Konkan; Heavy rain in Vidarbha, heavy rain in Marathwada | कोकणातील १८ नद्यांना पूर; विदर्भात अतिवृष्टी, मराठवाड्यात मुसळधार

कोकणातील १८ नद्यांना पूर; विदर्भात अतिवृष्टी, मराठवाड्यात मुसळधार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य महाराष्ट्राचा काही भाग वगळता राज्याला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. कोकणातील  १८ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.पूर्वविदर्भाचा संपर्क तुटलेला आहे. धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भातील गोसेखुर्द आणि खान्देशातील गिरणा व हतनूर धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे. हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. 

कोकणवासीयांची दाणादाण 

नवी मुंबई : कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामधील १८ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नद्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील २६० व रत्नागिरीमधील १९ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. कोकण विभाग महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात विशेष बैठक घेऊन यंत्रणा दक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. 

एनडीआरएफचे जवान तैनात
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून  दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे पथक, आपदा मित्र, प्रशासन सज्ज झाले आहे.

सिंधुदुर्गात पूरस्थिती 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेरेखोल नदीला आलेल्या पुराचे पाणी बांदा शहरातील आळवाडी, मच्छिमार्केट परिसरात घुसल्याने बाजारपेठेच्या काही भागाला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे.

नागोठणेतील एक जण बुडाला
मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला पाण्याने वेढले आहे. नागोठणे येथील अंबा नदीला पूर आल्याने तेथील महेद्र किसन कांबळे हा तरुण नदीपात्रात बुडून वाहून गेला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता.

मुंबईकर चाकरमान्यांची त्रेधा
मुंबई आणि उपनगरांत सखल भागात जागोजागी पाणी साचले तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर, नवी मुंबई, रायगड परिसरातील अनेक भाग जलमय झाले. बेस्ट आणि उपनगरीय वाहतूक सेवांचे तीनतेरा उडाल्याचे चित्र होते. अंबरनाथ- बदलापूरदरम्यान रेल्वेमार्गावरची खडी वाहून गेल्याने कल्याण-कर्जत उपनगरीय सेवा ठप्प झाली. तर कल्याण- कसारा सेवा तांत्रिक बिघाडामुळे रखडली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.

पाणीच पाणी
बुलडाणा जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी कमरेएवढे पाणी साचले होते. काही गाड्याही अर्ध्याहून अधिक पाण्यात होत्या.

मराठवाड्यातील ४७ मंडळांत झाली अतिवृष्टी
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर वगळता उर्वरित जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील ४७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

Web Title: Flooding of 18 rivers in Konkan; Heavy rain in Vidarbha, heavy rain in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.