मुंबई शहर आणि उपनगरात जलधारांचा मारा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:06 AM2021-07-20T04:06:38+5:302021-07-20T04:06:38+5:30

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारीदेखील दिवसभर पावसाची रिपरिप कायम राहिली. शनिवार आणि रविवारच्या तुलनेत सोमवारी पावसाचे प्रमाण ...

Floods continue in Mumbai city and suburbs | मुंबई शहर आणि उपनगरात जलधारांचा मारा कायम

मुंबई शहर आणि उपनगरात जलधारांचा मारा कायम

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारीदेखील दिवसभर पावसाची रिपरिप कायम राहिली. शनिवार आणि रविवारच्या तुलनेत सोमवारी पावसाचे प्रमाण कमी असले तरी पडझडीच्या घटना घडतच होत्या. अशाच घटनांमध्ये कुर्ला येथे दरड कोसळून तीन नागरिक जखमी तर वांद्रे येथील शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त झाडे कोसळणे, बांधकाम कोसळणे आणि शॉर्टसर्किटच्या घटनांचे सत्र सुरूच होते.

सोमवारी पहाटे पावसाने किंचित विश्रांती घेतली होती. त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईवर पावसाचा मारा सुरू झाला. पावसाच्या सरी मोठ्या नसल्या तरी सातत्याने मारा कायम राहिल्याने मुंबईचा वेग संथ झाला होता. मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गाची वाहतूक पंधरा मिनिटे विलंबाने धावत होती. तर रस्तेमार्गावर पावसाचे पाणी साचले नसले तरीदेखील पावसाचा मारा कायम असल्याने वाहनांचा वेग कमी होता. सोमवारी मुंबईत ७०.४ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

रविवारी दुपारी बारा वाजता कुर्ला येथील कसाईवाड्यात दरडीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. घटनास्थळी महापालिकेकडून मदतकार्य रवाना करण्यात आले. दुर्घटनाग्रस्त ठिकाणी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित असून, या दुर्घटनेत शाबीर, जाकीर आणि सैफान या तीन जणांना मार लागला. राजावाडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. रविवारी दुपारी अडीच वाजता वांद्रे पश्चिम येथील घरात पाणी भरल्यामुळे शॉक लागलेल्या महिलेस वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेचे नाव फातिमा अजगर कांचवाला (४५) आहे. या महिलेस अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

मुंबई शहरात एक, पूर्व उपनगरात सहा, पश्चिम उपनगरात तेरा ठिकाणी घर/भिंतीचा भाग पडला. याबाबतच्या तक्रारी संबंधित विभागाला कळवत येथे मदतकार्य धाडण्यात आले. मुंबई शहरात नऊ, पूर्व उपनगरात तीन आणि पश्चिम उपनगरात तीन अशा एकूण पंधरा ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. याची माहिती संबंधित विद्युत पुरवठा यंत्रणांना कळवून मदतकार्य रवाना करण्यात आले. मुंबई शहरात चार, पूर्व उपनगरात सात आणि पश्चिम उपनगरात दहा ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या.

Web Title: Floods continue in Mumbai city and suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.