Join us

शहरांना पुराचा वेढा कायम; प्रकल्पांमधून विसर्ग वाढल्याने रस्ते पाण्याखाली, अनेक जिल्ह्यांत संततधार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 9:55 AM

उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्यात मात्र पावसाची प्रतीक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शनिवारी रात्रीनंतर रविवारीही विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे प्रामुख्याने विदर्भात पूर परिस्थिती निर्माण झाली. पुरातून वाहने वाहून गेल्याच्या घटना घडल्या. कोल्हापूरमधील पूर परिस्थिती कायम असून, अनेक भागांत पाणी साचलेले आहे. सलगच्या पावसामुळे प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढल्याने विसर्ग करण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्यात मात्र पावसाची प्रतीक्षा आहे.

नांदेड : रविवारी सकाळी श्रीनगर भागात मुख्य रस्त्यावरील झाड कोसळले. यावेळी दुचाकीवरून जाणारे पती-पत्नी आणि मुलगा जखमी झाला आहे. उपचाराच्या दरम्यान यश पंकज गुप्ता (वय १०, रा.बाबानगर) याचा मृत्यू झाला.

हिंगोली : औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आठ दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे आठवडाभरात १८ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणात २० टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.  इसापूर धरणात ४२.५२ टक्के जलसाठा आहे. 

गडचिरोली : रविवारीही जिल्ह्याच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे बहुतांश मार्ग बंद आहेत. पावसाचा जोर कायमच असल्याने रात्रीतून ही स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. दहा दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पर्लकाेटा नदीवर पाणी असल्याने भामरागडसह तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला आहे.

गोंदिया : जिल्ह्यात शनिवारपासून पावसाचा जोर वाढला दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. या पावसामुळे रविवारी (दि. २८) जिल्ह्यातील तिरोडा व सडक-अर्जुनी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. तिरोडा तालुक्यात ८४.१ मिमी, तर सडक-अर्जुनी तालुक्यात ६६.९ मिमी पाऊस बरसला आहे. विशेष म्हणजे, १० मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. 

कोल्हापूर :  जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर ओसरला आहे. धरणातील विसर्गही कमी झाल्याने पुराच्या पाण्याची पातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात अर्ध्या फुटाने कमी झाली असून, सध्या ४७.२ फूट पाणीपातळी आहे. ८७ बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. ६३ मार्ग बंद आहेत. 

सांगली : आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी रविवारी दिवसभरात अर्ध्या फुटाने उतरली. सायंकाळी ५ वाजता ३९.५ फूट पातळी होती. त्यामुळे पुराचे संकट तूर्त टळले असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

सातारा : जिल्ह्यात रविवारी पुन्हा मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने कोयना धरणातून ३२ हजार क्यूसेक विसर्ग सुरू असून, सध्या ८४.०३ टीएमसी पाणीसाठा आहे. कण्हेर आणि वीर धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आला. कोयना नदीवरील मूळगाव पूल पाण्याखाली गेला आहे. 

नागपूर/बेला : सततच्या पावसामुळे ताेतलाडाेह (ता. रामटेक), निम्न वेणा (ता. उमरेड) आणि नांद (ता. उमरेड) या तिन्ही जलाशयांतील जलस्तर धाेक्याच्या पातळीकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे ताेतलाडाेहचे १४ गेट उघडण्यात आले, निम्न वेणाचे (वडगाव) २१ आणि नांदचे ७ गेट उघडले आहेत. या चार जलाशयांमधून सध्या एकूण १,८६७.७ क्युमेक विसर्ग सुरू आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नागपूर : पाण्याचा माेठ्या प्रमाणात विसर्ग हाेत असल्याने जिल्हा प्रशासनाने उमरेड तालुक्यातील नांद व वेणा जलाशयाच्या खालच्या भागाला वेणा नदीकाठी असलेल्या तसेच खेकरानाला जलाशयाच्या खालच्या भागातील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वेणा नदीच्या पुरामुळे पिके पाण्याखाली आली आहेत. 

सर आली धावून, वाहने गेली वाहून... पुलावरून पाणी असताना धाडस कशाला ?

समुद्रपूर (वर्धा) : नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तिघांचा समुद्रपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी पाण्यात उडी घेऊन प्राण वाचविला. रविवारी सकाळी ही घटना घडली. विलास शहाणे, हिरालाल बारेड आणि रामकिसन गौतम असे रेस्क्यू केलेल्यांची नावे आहेत.

भिवापूर (जि. नागपूर) : राज्य मार्गावरून वाहणाऱ्या नांद-चिखलापार नदीच्या पुरात ट्रकसह चालक व क्लीनर असे दोघे रविवारी सायंकाळी वाहून गेले. या थराराचा व्हिडीओही समोर आला आहे. नागरिकांनी ट्रकसह पुरातून प्रवास करण्यास मज्जाव केला. मात्र चालकाने त्याकडे दुर्लक्ष केले.  दोघांचाही शोध सुरू आहे. 

चंद्रपूर : येथील महाकाली काॅलरी मार्गावरील स्मशानभूमीसमोरील पुलावरून पाणी वाहत असताना दोन युवकांनी त्यात कार घातली असता, ती वाहून गेली. यावेळी समयसुचकता दाखवत दोन्ही युवक कारमधून उडी मारून बाहेर पडले. त्यामुळे ते बचावले. 

 

टॅग्स :पूरपाऊसमोसमी पाऊस