माळशेज घाटातील धबधबे पर्यटकांनी फुलले
By admin | Published: July 1, 2015 11:24 PM2015-07-01T23:24:09+5:302015-07-01T23:24:09+5:30
निसर्गाचे वरदान लाभलेला माळशेज घाट हा पावसाळ्यातील धबधबे सुरु झाल्याने सध्या रोज भरगच्च भरलेला असतो. त्यात शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी तरुणाई उधाणलेली दिसते.
राजेश भांगे, शिरोशी
निसर्गाचे वरदान लाभलेला माळशेज घाट हा पावसाळ्यातील धबधबे सुरु झाल्याने सध्या रोज भरगच्च भरलेला असतो. त्यात शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी तरुणाई उधाणलेली दिसते.
शनिवार व रविवार हे आठवड्याचे दोन दिवस माळशेज घाट येथे थंडगार पाणी व धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी मुंबई, नाशिक, कर्जत, खोपोली, कल्याण, ठाणे इत्यादी ठिकाणावरून पर्यटक माळशेजला मौज-मजा करण्यासाठी येत असतात. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने त्यातच दोन आठवडे सतत दरडी कोसळत असल्याने पर्यटकांनी छत्री पॉईंटपासून खाली असणारे अनेक पर्यायी धबधबे भिजण्यासाठी निवडले. काही हौशी पर्यटक धबधब्यामध्ये उंचावरून उड्यासुद्धा मारत होते. काही मित्रांसोबत तर काही परिवारासोबत आलेले पर्यटक सुद्धा होते. मात्र पाण्यामध्ये भिजून झाल्यावर कपडे बदलण्यासाठी चेंजींगरूम नसल्याने त्यांच्यावर ओलेते राहण्याची पाळी ओढावली होती. बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांसाठी टोकावडे गावापासून एसटी बसची दोन-दोन मिनिटांवर सेवा सुरु आहे. त्यामुळे येथे येण्यासाठी स्वता:ची वाहने हवीच अशी काही बाब नाही. तसेच पर्यटकांना खाण्यासाठी आदिवासी नागरिकांनी शंभर ते दोनशे मीटरवर जागोजागी वडापाव व आमलेट पाव तसेच भुट्टा यांची दुकाने थाटलेली दिसत आहेत व शासनाचे माळशेज रिसॉर्ट हे सुद्धा थाटामाटात उभे असल्याने पर्यटकांना राहण्याची उत्तम सोय येथे होतांना दिसते. धबधब्यातील पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून जाणारे पर्यटक यांच्या सुरक्षेसाठी धबधब्याच्या बाजुला साईडगार्ड बसवण्यात आले आहेत. मद्यधुंद पर्यटकांना माळशेज घाटात जाण्यापासून रोखण्यासाठी मोरोशी येथे चेक नाका उभारण्यात आला असून प्रत्येक गाडीची कसून चौकशी करुनच माळशेजमध्ये पाठवण्यात येतात. तसेच माळशेज मध्ये कल्याण, मुरबाड, ठाणे, टोकावडे, किन्हवली पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी अॅब्युलन्स सेवाही उपलब्ध आहे. येथील मौज म्हणजे हव्या त्या आकाराचे आणि उंचीचे धबधबे उपलब्ध आहेत. त्यांची गती पण वेगवेगळी आहे. त्यामुळे अधिक मजा येते. मध्यभागी असलेला सगळ्यात उंच धबधबा हा मोठे आकर्षण आहे. यावेळी खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरून अदृश्य झालेली मॅगी खवय्यांना चांगलीच आठवते आहे. मात्र त्याची भर आॅम्लेट पाव, भुर्जीपाव याने भरून काढली आहे. गोलभजी आहेतच. महामार्गाच्या दुतर्फा धाब्यांचाही धंदा त्यामुळे जोरात आहे.
कसे जाल?
माळशेजला जाण्यासाठी रस्ता एकदम सोपा आहे. कल्याणमधून मुरबाड रोड पकडायचा तोच पुढे माळशेजला जातो. शहापूरवरून मधल्या रस्त्याने मुरबाडलाही थेट जाऊन पुढे माळशेजला जाता येते. तर पुण्यावरून येणाऱ्या मंडळींना आळेफाटा-ओतूर मार्गे माळशेजला पोहोचता येते.