मुंबई : मुंबईच्या आसपासच्या परिसरासह राज्यातील बहुतांश ठिकाणी विशेषत: कोकण (मुंबईसह) आणि मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. आता येथील पूर ओसरू लागले असले तरीदेखील सर्प दंशाच्या घटनांपासून नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षा बाळगावी, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. मुंबईतदेखील सखल भागात पावसाचे पाणी साचले. आता बहुतांश ठिकाणे पूर्ववत होत असली तरी गावातील, शेतातील, रानमाळातील, डोंगर पायथ्यानजीकची सर्पांची वास्तव्याची म्हणजे बिळे, सर्पांची वारुळे, विटा-दगड-मातीचे ढिगारे, दगडगोट्यांच्या चिरा, भिंतीमधील भेगांमध्ये सर्प, विंचू पाण्याबरोबर प्रवाहित होत पडवी, माजघर किंवा काही वेळेस स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आणि भक्ष्याच्या शोधात घरात शिरतात. अशा प्रसंगी सर्प दंश, विंचू दंश टाळण्यासाठी सुरक्षेचे उपाययोजना करण्यात यावी, असे सर्पमित्र भरत जोशी यांनी सांगितले.
हे करा
- अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून, पुढील काही तास तो पूर्ववत होण्याची शक्यता कमी आहे. अशावेळी सोबत एक काठी आणि टॉर्च बाळगावी.
- रात्री कंदिल, दिवटी, मेणबत्ती, पेट्रोमॅक्स चालू ठेवावा. असे केल्याने साप, विंचू, जळू शक्यतो घरात प्रवेश करत नाहीत.
- नेहमी चप्पल, सँडल, बूट आणि गमबुटाचा वापर करावा.
- चटई, सतरंजी, ब्लँकेट झाडून-झटकून घ्यावे.
- पाण्यातून, चिखलातून वावरताना हातात नेहमी काठी बाळगावी.
सर्पदंश झाला तर.
- सर्पदंश झाला तर प्रथमोपचार देत संबंधिताला सरकारी ग्रामीण रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करावे.
- डाव्या हाताला सर्प दंश किंवा विंचू दंश झाल्यास हाताच्या कोपरापासून खालच्या दिशेन क्रेप बँडेज बांधा.
- सर्पदंशावर पाण्याची संततधार सोडा. हाताच्या कोपरापासून खालच्या दिशेने हाताने दाबत रहा. म्हणजे रक्ताबरोबर ५० टक्के विष आणि विषारी रक्त सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून बाहेर पडेल.
- सर्प दंश झालेल्या व्यक्तीवर मंत्रतंत्र, झाडपाला, कोंबड्या लावण्याचा अघोरी प्रकार करू नका.