मुंबई : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर दादर, गिरगाव व अन्य फुल बाजार झेंडूच्या फुलांनी भरून गेले आहेत. झेंडू, शेवंती, मोगरा या फुलांना जास्त मागणी आहे. मात्र कलकत्ता झेंडूच्या फुलांना लोक जास्त पसंती देत आहेत. ही फुले सातारा, सांगली जिल्ह्यातून मागवली जातात. पण यंदा अवकाळी पावसामुळे त्यांची आवक घटली आहे. दरवर्षीच्या मानाने यावर्षी कमी प्रमाणात फुले बाजारात विक्रीस आल्याचे अनेक फुलविक्रेत्यांनी सांगितले. याचा परिणाम फुलांच्या किमतीवर झालेला आहे. झेंडूचा वाढता भाव बघून अनेक जण शेवंती, गुलछडी आणि गुलाबांच्या पाकळ््या घेण्याकडे वळत. झेंडूच्या फुलांना कमी करण्यासाठी तोरणात भर म्हणून भाताच्या लोंब्या आणि तुऱ्यांची खरेदी करताना अनेक जण दिसत आहेत. तसेच रेडिमेड झेंडूच्या फुलांनाही मागणी आहे. यात सिंगल लेअरपासून ते मोठमोठ्या सराफांच्या दुकांनाना लावल्या जाणाऱ्या मल्टीलेअर आणि मल्टिफ्लावर फुलांचा पर्यायही आहे. अशी तोरणे २० ते ७० रुपये एक हात या किमतीत आहेत, तर आॅर्कीड, मोगरा आणि गुलछडीचा वापर करून तयार केलेली तोरणेसुद्धा आहेत. पण या तोरणांत विविध आणि महागड्या फुलांचा वापर केल्यामुळे अशी तीसुद्धा महाग आहेत. महागाई असली अनेक बाजार लोकांनी फुलून गेले आहेत. परवडत नसलेल्या गोष्टींना पर्याय शोधून दिवाळी आनंदातच साजरी करण्याचे वातावरण सगळीकडे आहे.
लक्ष्मीपूजनासाठी फुलांचा भाव वधारला
By admin | Published: November 11, 2015 2:29 AM