Join us  

उपहारगृहांची होणार झाडाझडती

By admin | Published: October 18, 2015 3:07 AM

कुर्ला पश्चिमेकडील सिटी किनारा उपहारगृहामध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर आता महापालिकेला जाग आली आहे. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत, म्हणून आता उपहारगृहांच्या तपासणीची

मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील सिटी किनारा उपहारगृहामध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर आता महापालिकेला जाग आली आहे. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत, म्हणून आता उपहारगृहांच्या तपासणीची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. विभाग स्तरावर तपासणीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पथक स्थापन करण्यात येणार आहे. या पथकात वैद्यकीय अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पदनिर्देशित अधिकारी यांचा समावेश असणार आहे.उपहारगृहांना परवानगी देताना अग्निशमन दलाने दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रातील बाबींची पूर्तता झाली आहे की नाही, परवानगी देत असताना जागेचे क्षेत्रफळ, ज्या वापराकरिता परवानगी दिली आहे, त्याकरताच प्रत्यक्ष वापर होत आहे की नाही. जागेत काही बदल करण्यात आले आहेत की नाहीत. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी अटी व शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे की नाही, या बाबींची तपासणी हे पथक करणार आहे. शिवाय प्रत्यक्ष तपासणीच्या वेळी अग्नि सुरक्षेच्या दृष्टीने ज्या बाबी निदर्शनास येतील, त्या बाबींवर अग्निशमन अधिकाऱ्यांनी तपासणी अहवाल देणे बंधनकारक असणार आहे. शिवाय या बाबतच्या लेखी अहवालावर पथकाची स्वाक्षरी असणे गरजचे असणार आहे. संबधित प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास वीज व पाणी खंडित करण्यासह पोलीस कारवाईची शिफारसही पथकाला करता येणार आहे.हॉटेल चालक पसार कुर्ला येथील सिटी किनारा हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी व्ही.बी नगर पोलीस ठाण्यात हॉटेल चालक शरद त्रिपाठी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.अटकेच्या भितीने हॉटेल चालक पसार झाला आहे. मोबाईलच्या टॉवर लोकेशनच्या अधारे पोलीस त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. १९ आॅक्टोबरपासून सुरू होणार तपासणी१९ आॅक्टोबरपासून याबाबतची तपासणी सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागात दररोज किमान १० उपहारगृहांच्या तपासण्या केल्या जातील. ही तपासणी विभाग स्तरावरील सहायक आयुक्तांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली असणार आहे.सुरक्षेच्या दृष्टीने ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी श्रेणी २ व श्रेणी ३ या दर्जाच्या उपहारगृहामध्ये अभावाने दिसून येते. त्यामुळे श्रेणी २ व ३ या दर्जाच्या उपहारगृहापासून तपासणीला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर श्रेणी १ च्या उपहारगृहाची तपासणी करण्यात येईल.