Join us

श्रावणात फूलबाजार बहरला; फूलखरेदी वाढली; दरांमध्येही किंचित वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:09 AM

मुंबई : श्रावण महिन्याची सुरुवात होताच फुलांची मागणी वाढल्याने दादर फूल मार्केटमध्ये विविध प्रकारची फुले दाखल झाली आहेत. ग्राहकदेखील ...

मुंबई : श्रावण महिन्याची सुरुवात होताच फुलांची मागणी वाढल्याने दादर फूल मार्केटमध्ये विविध प्रकारची फुले दाखल झाली आहेत. ग्राहकदेखील मागील काही दिवसांपासून फूलखरेदीसाठी येत असल्याने आता दादरचा फूलबाजार बहरला आहे. श्रावणात फुले, हार व तोरण यांना जास्त मागणी असल्याने अनेक ग्राहक मुंबईतील दादर येथील फूलबाजारातून फुले विकत घेतात.

झेंडू, शेवंती, गुलाब, अस्टर यांना श्रावण महिन्यात देवपूजेसाठी जास्त मागणी असते. यामुळे फूलबाजारात त्यांची आवक जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे.

यंदा कोरोनाचे संकट कायम असले तरीदेखील सण उत्साहात साजरे करण्यासाठी नागरिक फुलांची खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांनी फुलांची लागवड कमी केल्याने यंदा दादरच्या फूलबाजारात फुलांची आवक तुलनेने कमी झाली आहे.

पुणे, सांगली, सातारा व नाशिक या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे व पुराचा तडाखा बसल्याने काही प्रमाणात फुलांची आवक घटली. तरीदेखील महाराष्ट्राच्या विविध भागांतून दादर फूलबाजारामध्ये शेतकरी फुले घेऊन येत आहेत. फुलांचे दर १० ते १५ रुपयांनी वाढले असले तरीदेखील नागरिक पूजेसाठी हार व फुले खरेदी करीत आहेत.

श्रावण सुरू होताच फुलांची विक्री वाढल्याने व्यापाऱ्यांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दादर फूलबाजाराचे संस्थापक-संचालक दादाभाऊ येणारे यांनी सांगितले.

काय आहेत फुलांचे दर

कलकत्ता गोंडा ४० रुपये किलो

पिवळा गोंडा ४० रुपये किलो

मोठा गोंडा ५० रुपये किलो

नामधारी गोंडा ३० रुपये किलो

कपरी गोंडा ४० रुपये किलो

लाल कलकत्ता ४० रुपये किलो

गुलछडी ६० रुपये किलो

शेवंती ३० रुपये किलो

अस्टर ४० रुपये किलो

गुलाब ५० रुपये बंडल

लिली ३ रुपये बंडल