बाप्पाच्या स्वागतासाठी फूल मार्केट सजले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 01:59 AM2020-08-21T01:59:30+5:302020-08-21T02:05:32+5:30

दादरच्या फुल मार्केटमध्ये फुलांची आवकही दरवर्षीप्रमाणेच झाली आहे.

A flower market was set up to welcome Bappa | बाप्पाच्या स्वागतासाठी फूल मार्केट सजले

बाप्पाच्या स्वागतासाठी फूल मार्केट सजले

Next

मुंबई : गणेशोत्सवासाठी दादर येथील फूल मार्केट विविध फुलांनी सजले आहे. मुंबईवर कोरोनाचे संकट असले तरीही नागरिक लाडक्या बाप्पासाठी फुले खरेदी करण्यासाठी दादर येथे गर्दी करत आहेत. यासाठीच दादरच्या फुल मार्केटमध्ये फुलांची आवकही दरवर्षीप्रमाणेच झाली आहे.
पुणे, सांगली, सातारा व नाशिक अशा महाराष्ट्राच्या विविध भागांतून दादर फूल मार्केटमध्ये शेतकरी फुले घेऊन येत आहेत. यंदा फुलांना भावही चांगला असून नागरिकही बाप्पाच्या पूजेसाठी, तसेच हार आणि सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात फुले खरेदी करत आहेत. कोरोनाच्या काळातही फुलांची विक्री होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दादर फूल मार्केटमध्ये झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी आहे. झेंडूच्या फुलांमध्ये कलकत्ता गोंडा ८० ते १०० रुपये किलो व पिवळा गोंडा १४० ते १६० रुपये किलो या दरांमध्ये उपलब्ध आहेत. त्यासोबतच शेवंती फुलांनाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पिवळी शेवंती १६० रुपये किलो, जांभळी शेवंती १६० रुपये किलो, पांढरी शेवंती १२० रुपये किलो व दांडी शेवंती २८० रुपये किलो या दरांमध्ये उपलब्ध आहे. तसेच गुलछडी ६० रुपये किलो, गुलाब पाकळ्या ६० रुपये किलो, लिली दहा रुपये बंडल, गुलाब फूल चाळीस रुपये बंडल व सूर्यफूल ६० रुपये बंडल, अशा किमतीत उपलब्ध आहेत.
दादर फूल मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडून सुरक्षेसंदर्भात सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही नागरिक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. नागरिक मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करत असले तरी फूल मार्केटमध्ये एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखले जात नाही. सण साध्या पद्धतीने साजरा करत असलो तरी खरेदी मात्र करावी लागणारच, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
>अंधेरीच्या राजाचा गणेशोत्सव साधेपणाने होणार साजरा
मुंबई : नवसाला पावणारा गणपती व दरवर्षी संकष्टीला विसर्जन होणारा गणपती अशी अंधेरीच्या राजाची ख्याती आहे. दरवर्षी लाखो भक्त अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट लक्षात घेता आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आझादनगर उत्सव समितीने यंदा अंधेरीच्या राजाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती या समितीचे प्रमुख मार्गदर्शक अध्यक्ष यशोधर(शैलेश) फणसे यांनी ‘लोकमत’ला दिली. दरवर्षी अंधेरीच्या राजाची मूर्ती सुमारे ८ फूट असते. मात्र यंदा येथील मूर्ती चार फुटांची आहे. नागरिकांनी दर्शनाला गर्दी करू नये आणि सर्वांना लांबून अंधेरीच्या राजाचे खुल्या मंडपातून दर्शन मिळण्यासाठी खास हायड्रॉलिक लिफ्टवर अंधेरीच्या राजाची मूर्ती विराजमान असेल आणि नागरिकांना लांबूनही सुलभ दर्शन मिळेल. यंदा स्वर्गाचा देखावा साकार केला आहे. विशेष म्हणजे येथील गणेशोत्सवाबरोबरच आरोग्योत्सव समिती साजरा करणार आहे़

Web Title: A flower market was set up to welcome Bappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.