उमाजी नाईक यांना पुष्प अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:05 AM2021-09-13T04:05:14+5:302021-09-13T04:05:14+5:30
मुंबई : आद्यक्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. ...
मुंबई : आद्यक्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त श्यामलाल गोयल यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
------------------
शिधापत्रिका देण्याची कार्यवाही
मुंबई : मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना प्राधान्याने शिधापत्रिका देण्याची कार्यवाही सुरू आहे. अनाथांना वयाच्या २८ वर्षांपर्यंत तात्पुरती पिवळी शिधापत्रिका वितरित करून, प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी अनाथ असल्याचा पुरावा म्हणून महिला व बालविकास विभागाने वितरित केलेले अनाथ प्रमाणपत्र किंवा आई व वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईचे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलास पगारे यांनी दिली.
------------------
मन मोहन शर्मा पुरस्कार
मुंबई : विद्यार्थ्यांना विज्ञान संशोधनाकडे वळवायचे असेल, तर महाविद्यालयीन आणि विद्यापीठांतील प्राध्यापकांनी उच्च दर्जाचे संशोधन करणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे संशोधन करणाऱ्या प्राध्यापकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रा.मनमोहन शर्मा पुरस्कार योजना, मराठी विज्ञान परिषद गेली सात वर्षे राबवित आहे. विद्यापीठांतील (खासगी/अभिमत) व संलग्नित महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी हे पुरस्कार आहेत. त्याचे स्वरूप, प्रत्येकी रुपये एक लाख रोख व गौरवपत्र असे आहे. अर्ज भरून पाठविण्याची वाढीव अंतिम मुदत २० सप्टेंबर आहे.
------------------
शैक्षणिक संस्थांना मदत
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खार येथील रामकृष्ण आश्रम व मठाला भेट दिली. मंत्रोचारात राज्यपालांचे स्वागत झाल्यावर राज्यपाल स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले. रामकृष्ण मिशनच्या कार्याचे कौतुक करताना, राज्यपालांनी मिशनद्वारे चालविल्या जाणाऱ्या हॉस्पिटलला अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी, तसेच मिशनच्या शैक्षणिक संस्थांच्या अडचणी सोडविण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले.
------------------
निधीचे वितरण
मुंबई : माता व बाल मृत्युदर कमी करण्याबरोबरच माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत महाराष्ट्रात सुमारे २३ लाख ९२ हजार लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. सुमारे १ हजार कोटीपेक्षा जास्त निधीचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.