गळती थांबल्यामुळे फ्लोरा फाउंटन पुन्हा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 04:46 AM2019-02-06T04:46:47+5:302019-02-06T04:46:51+5:30
हुतात्मा चौक येथील प्रसिद्ध फ्लोरा फाउंटनचे लोकार्पण झाल्यानंतर या वास्तुमध्ये गळती आढळून आली. परिणामी येथील कारंज्या तात्काळ बंद करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली होती.
मुंबई : हुतात्मा चौक येथील प्रसिद्ध फ्लोरा फाउंटनचे लोकार्पण झाल्यानंतर या वास्तुमध्ये गळती आढळून आली. परिणामी येथील कारंज्या तात्काळ बंद करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली होती. या वास्तुमध्ये दोन ठिकाणी असलेली गळती दुरूस्त करण्यात आल्याने येथील कारंज्या पुन्हा एकदा थुईथुई नाचू लागल्या आहेत.
पुरातन वास्तू श्रेणी १ मध्ये असलेल्या १५५ वर्षे जुन्या फ्लोरा फाउंटनची दुरुस्ती दोन टप्प्यामध्ये सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होताच २४ जानेवारी रोजी फ्लोरा फाउंटनचे लोकार्पण करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी गळती सुरू असल्याचे आढळून आले़ त्यानंतर फ्लोरा फाउंटन बंद करण्यात आले. पालिकेला टिकेचे धनी व्हावे लागले होते.
ही गळती नेमकी कुठून सुरु आहे, हे लक्षात येत नव्हते. गळती शोधण्यासाठी पालिकेच्या अभियंत्यांना अथक प्रयत्न करावे लागले.
अखेर वास्तुमध्ये दोन ठिकाणी गळती असल्याचे सापडले़ त्याची तत्काळ दुरूस्त करण्यात आली. त्यानुसार शनिवार दि. २ फेब्रुवारीपासून येथील कारंज्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. या कारंज्या सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहेत.
यामुळेच केले नुतनीकरण..
१८६४ मध्ये फ्लोरा फाउंटन (कारंजे) बांधण्यात आला. २००७-२००८ पासून या कारंज्यांमधून पाणी कमी येऊ लागले. कारंज्यांसाठी वापरण्यात आलेल्या दगडांची लकाकीही कमी झाली होती. काही शिल्पकृतींचे हात, नाक असे अवयव तुटले होते. २०१६ मध्ये हा फाउंटन दुरुस्त करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे़ दुसºया टप्प्यात या वास्तुच्या आसपासच्या परिसराचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे.
अशी सुरु होती गळती...
एकावेळी कारंजांसाठी ४० हजार लिटर पाणी वापरण्यात येते. कारंजा सुरू झाल्यावर पाण्याचा पुन्हा वापर केला जातो. उन्हामुळेदेखील पाण्याचे बाष्पीभवन होते. कारंजामधून पाणी काही प्रमाणात कमी होत असले तरी पाण्याची गळती त्याहून मोठी होती. यामुळे दर तीन दिवसांनी दहा हजार लिटर टँकर पाणी या कारंजामध्ये टाकावे लागत होते.