विकासकामांचा उडविला बार; दोन बैठकांमध्ये स्थायी समितीची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:46 AM2019-09-14T00:46:31+5:302019-09-14T00:46:44+5:30
एक हजार कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगूल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असल्याने, विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करण्याची शिवसेनेची घाई सुरू आहे. गेल्या चार दिवसांमध्ये तब्बल एक हजार कोटींचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत. आचारसंहितेच्या धास्तीने सोमवारी तातडीने पालिका महासभा बोलावून विकासकामांना हिरवा कंदील दाखविला जाणार आहे.
एप्रिल महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांच्या काळात विकासकामे ठप्प होती. मात्र, निवडणुकीनंतर चार महिन्यांचा कालावधी पालिकेला मिळाला होता, परंतु या काळात अनेक प्रस्तावांची मंजुरी लांबणीवर पडली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यास, नोव्हेंबरपर्यंत महापालिकेला विकासकामांना मंजुरी घेता येणार नाही. त्यामुळे सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षातील तरतुदी वाया जाण्याची शक्यता आहे.
हा धोका टाळण्यासाठी विकासकामांचा बार निवडणुकीपूर्वी
उडवून देण्याचा सपाटा पालिकेने लावला आहे. सोमवारी सुमारे ५५० कोटींचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले
होते, तर बुधवारच्या बैठकीत आणखी ५१४ कोटींचे ५० प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यामध्ये नवीन पुलांची पुनर्बांधणीसाठी
२०८ कोटी आणि पर्जन्य वाहिन्यांच्या १५७ कोटींच्या कामाचा समावेश आहे.
१४ नवीन पूल
हन्सबुर्ग पूल-वांद्रे, अंधेरी पूर्व- मजास नाला- धोबीघाट पूल, अंधेरी - मेघवाडी जंक्शन इनआॅर्बिट मॉल, गोरेगाव प. पिरामल नाला येथील पूल, मालाड - डी मार्टजवळील पूल, बोरीवली-दहिसर नदी- रतननगर पूल, वांद्रे- जुहू तारा पूल - ९१ कोटी ४२ लाख रुपये खर्च. या पुलांच्या पुनर्बांधणीला तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
दहिसर आणि कांदिवलीदरम्यान सात नवीन पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी ११७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालय ते प्रवीण संघवी मार्गपर्यंत जाणाऱ्या स्कायवॉकचा खर्च ६६ कोटी आहे. भायखळा येथील पर्जन्य वाहिन्यांच्या कामांसाठी १५७ कोटी ६० लाख रुपये १२३ कोटींचे अन्य प्रस्ताव मंजूर.