Join us

मकरसंक्रांतीला पतंग उडवा; पण जरा जपून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:35 AM

मुंबई : मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला जात असला तरीदेखील सुरक्षेचा विचार करता वीज वाहून नेत असलेल्या तारांपासून ...

मुंबई : मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला जात असला तरीदेखील सुरक्षेचा विचार करता वीज वाहून नेत असलेल्या तारांपासून दूर अंतरावर पतंग उडविण्यात यावेत, असे आवाहन वीज कपन्यांनी केले आहे. तर दुसरीकडे पतंग उडविताना धारदार मांजाचा वापर करू नये. त्याऐवजी साध्या धाग्याचा वापर पतंगबाजांनी करावा. जेणेकरून त्याचा फटका मनुष्यप्राण्यासह पक्ष्यांना बसणार नाही, असे पक्षिमित्रांनी सांगितले.

पतंग उडविताना उच्च दाबाच्या (हाय टेन्शन) ओव्हरहेड वीज पारेषण तारांपासून दूर राहण्याचा सल्ला अदानी वीज कंपनीने दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा ‘मांजा’ हा विजेचा वाहक आहे. मांजाच्या आवरणामध्ये धातूची भुकटी वापरली असेल तर तो खूपच धोकादायक असतो.

अशा मांजाचा ओव्हरहेड वीज वाहक तारांना स्पर्श झाला किंवा तो तारांच्या वक्रकक्षेत जरी आला तरी तो अतिउच्च विद्युतदाबाचे वहन करू शकतो. ओव्हरहेड वायरजवळ पतंग उडवणे जीवासाठी धोकादायक ठरू शकते. शिवाय मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. पॉवर ग्रिडला हानी पोहोचून परिसर काळोखात जाऊ शकतो. परिणामी एखादी दुर्घटना घडू शकते.वर्सोवा, ओशिवरा, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरीवली येथे उच्चदाबाच्या ओव्हरहेड वायर आहेत. या भागांत ओव्हरहेड वायरजवळ पतंग उडविणे टाळावे. 

पतंग उडविण्यासाठी धारदार मांजा वापरला जातो. चायनिज मांजाला अत्यंत धार असल्याने पक्षी जखमी होण्यासह त्यांचा बळी जाऊ शकतो. मात्र या मांजामुळे पशू, पक्षी जखमी होतात. अनेकदा ते पशू-पक्ष्यांच्या जीवावरही बेतते. शहरातील प्रदूषणामुळे पक्ष्यांचे प्रमाण कमी होत आहे. परिणामी, नागरिकांनी पक्ष्यांना वाचविण्यासाठी हातभार लावला पाहिजे.- प्रमोद माने, अध्यक्ष, स्पॅरोज शेल्टर

टॅग्स :पतंग