मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सेवा-सुविधांची कामे सुरू असून यातील वांद्रे कला नगर येथे सुरू असलेल्या फ्लायओव्हरच्या कामाने वेग पकडला आहे. हे काम लवकर पूर्ण होईल, असा दावा प्राधिकरणाने केला असून, या प्रकल्पामुळे मुंबईचा प्रवास आणखी वेगवान होईल, असा विश्वास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई परिसरात सुरू असलेल्या कामांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव सातत्याने आढावा घेत आहेत. मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ चा आढावा सुरू असतानाच मंगळवारी आयुक्तांनी आपला मोर्चा वांद्रे येथील कलानगर फ्लायओव्हरकडे वळविला. राजीव यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. या वेळी राजीव म्हणाले, हा फ्लायओव्हर पूर्ण झाल्यानंतर बीकेसी आणि सभोवतालच्या भागात जाणे अधिक सोपे होईल; शिवाय प्रवास वेगवान होईल. महत्त्वाचे म्हणजे कलानगर जंक्शनच्या सभोवतालच्या रहदारी टप्प्यात ऐन वाहतूककोंडीदरम्यान प्रवास सुलभ होईल. हा एक महत्त्वपूर्ण पायाभूत सेवा-सुविधा प्रकल्प असून, बीकेसी आणि लगतच्या परिसरासाठी याचा नक्कीच फायदा होईल. दरम्यान, जागतिक दर्जाचे व्यावसायिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या बीकेसीमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आजही सुमार दर्जाचीच आहे. मुंबईतील झपाट्याने विकसित होत असलेल्या बीकेसी या व्यावसायिक केंद्रात दिवसाकाठी चार लाख लोक ये - जा करतात. त्यामुळे या भागात वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. कलानगर येथील कामामुळे मदत होईल, असा दावा केला जात आहे.