पुढल्या वर्षी भाववाढ होण्याची शक्यता नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जगातील प्रमुख शहरांमधील प्राईम मालमत्तांच्या किमती पुढील वर्षी दोन टक्क्यांनी वाढण्याची चिन्हे असली तरी मुंबई शहरांतील उच्चभ्रू परिसरातील घरांच्या किमती जैसे थे राहतील, असे भाकीत व्यक्त केले जात आहे. कोरोना संक्रमणाच्या कालखंडात या शहरातील घरांच्या किमती १.३ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. सध्या घरांची मागणी वाढत असली तरी येत्या वर्षभरात या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता नाही.
नाईट फ्रँकने प्राईम ग्लोबल फोरकास्ट, २०२१ हा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला असून त्यात ४५ प्रमुख शहरांची तुलना करण्यात आली आहे. जवळपास सर्वच प्रमुख शहरांतील घरांच्या किमती २०२० मध्ये कमी झाल्या आहेत. ९ शहरांमध्ये तो ट्रेण्ड वर्षाअखेरीपर्यंत कायम राहिल. मात्र, जगातील २२पैकी २० शहरांतील मालमत्तांच्या किमती आहे तशाच किंवा थोड्याफार फरकाने वाढतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यात भारतातील मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू या शहरांचा समावेश आहे. दिल्ली येथील प्राईम मालमत्तांची परिस्थिती ही मुंबईच्या तुलनेने उजवी आहे. दिल्लीतील मालमत्तांच्या किमतींमध्ये ०.२ टक्के अशी जुजबी वाढ झाली असली तरी जागतिक क्रमवारीत या शहराचा २७वा क्रमांक लागतो. मुंबई १.३ टक्क्यांसह ३३व्या क्रमांकावर आहे. तर बंगळुरूचा ३४वा क्रमांक आहे.
लॉकडाऊननंतर घरांच्या किमतींमध्ये थोडेफार बदल झाले असून लक्झरी मालमत्तांच्या किमती आता स्थिरावू लागल्या आहेत. सर्वच श्रेणीतल्या घरांच्या खरेदीसाठी ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ज्या शहरांतील आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येत आहेत ती शहरे क्रमवारीत पुढे जात असल्याचे मत नाईट फ्रँकचे चेअरमन शिरीष बैजल यांनी व्यक्त केले आहे.