मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ कडून वांद्रे दिशेने जाणाऱ्या वाहनांचा प्रवास आणखी जलद होणार आहे. टर्मिनल २ (टी २) जंक्शनकडून वांद्रे दिशेला जाणाऱ्या वाहनांसाठी उभारलेल्या उड्डाणपुलाचे आठवडाभरात उद्घाटन केले जाणार आहे. त्यामुळे अंधेरी बाजूकडून टर्मिनल १, विलेपार्लेकडे जाणाऱ्या वाहनांचीही कोंडीतून सुटका होणार आहे.
गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होते. त्यातच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ कडून येणारी वाहनेही टर्मिनल १ जवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर दाखल होत असल्याने या भागातील कोंडीत भर पडते.
७९० मीटर लांबीचा पूल :
१) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) टी २ टर्मिनलकडून येणाऱ्या वाहनांचा प्रवास जलद होण्यासाठी टी २ जंक्शन येथून वांद्रे दिशेला पश्चिम द्रुतगती मार्गाला समांतर अशा उड्डाणपुलाची निर्मिती केली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर टर्मिनल १ जवळ होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ७९० मीटर लांबीचा एकेरी वाहतुकीसाठी उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.
२) हा उड्डाणपूल नंदगिरी गेस्ट हाऊस येथून सुरू होऊन भाजीवाडी येथील साई मंदिराजवळ संपतो. या उड्डाणपुलामुळे टर्मिनल २ कडून वांद्रे दिशेला जाणाऱ्या वाहतुकीच्या रहदारीची क्षमता वाढणार आहे.
३) यातून या भागात पश्चिम द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलाखालील कोंडी घटणार आहे. त्यातून वाहनांना सिग्नलला थांबण्याचा वेळ कमी होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
४) उड्डाणपुलाचे काम आठवडाभरापासून पूर्ण झाले आहे. मात्र केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मिळत नसल्याने त्याचे उद्घाटन रखडले आहे, असा आरोप माजी मंत्री आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आ. आदित्य ठाकरे यांनी केला होता. उड्डाणपुलावरील दिवे रात्रभर सुरू असतात. मात्र त्याचवेळी मुंबईकर मात्र खालील रस्त्यावर वाहतूक कोंडीत तासंतास अडकलेले असतात.
५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहंकार बाजूला ठेवून उड्डाणपूल खुला करावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली होती. दरम्यान, उड्डाणपुलाच्या विलंबाबाबत एमएमआरडीएकडे विचारणा केली असता, उड्डाणपुलाचे अंतिम टप्प्यातील रंगरंगोटीचे आणि वाहतूक चिन्हांच्या उभारणीचे काम सुरू आहे. ही कामे पूर्ण करून आठवडाभरात हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.