उड्डाणपूलही खड्ड्यात
By admin | Published: July 5, 2016 02:18 AM2016-07-05T02:18:58+5:302016-07-05T02:18:58+5:30
ऐन पावसाळ्यात शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून, यातून शहरातील उड्डाणपूलही सुटलेले नाहीत. सायन रुग्णालय उड्डाणपूल, नानालाल डी. मेहता उड्डाणपूल, जगन्नाथ
- ओम्कार गावंड, मुंबई
ऐन पावसाळ्यात शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून, यातून शहरातील उड्डाणपूलही सुटलेले नाहीत. सायन रुग्णालय उड्डाणपूल, नानालाल डी. मेहता उड्डाणपूल, जगन्नाथ नानाशंकरशेठ उड्डाणपूल, हिंदमाता उड्डाणपूल आणि परळ टीटी उड्डाणपूल यांसारख्या महत्त्वाच्या उड्डाणपुलांवर खड्डे पडले असून, पावसाळा सुरू झाला तरी महापालिकेने या उड्डाणपुलांवरील खड्डे बुजविण्याची तसदी घेतलेली नाही. परिणामी, वाहनचालकांना खड्ड्यांचा अतोनात त्रास होत असून, वाहनांचे अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत काही उड्डाणपूल आहेत. महत्त्वाचे म्हणजे शहर आणि उपनगरातील कोणता उड्डाणपूल कोणत्या प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे? याची माहिती मुंबईकरांना नाही. सर्वांत महत्त्वाची बाब ही की; संबंधित उड्डाणपुलाच्या दुरुस्तीबाबत एखादे निवेदनवजा तक्रार द्यायची झाल्यास ती कोणाकडे द्यायची? याबाबत मुंबईकर कायमच संभ्रमात असतात.
‘लोकमत’ने नेमका याचाच पाठपुरावा करीत खड्डे पडलेले सायन रुग्णालय उड्डाणपूल, नानालाल डी. मेहता उड्डाणपूल, जगन्नाथ नानाशंकरशेठ उड्डाणपूल, हिंदमाता उड्डाणपूल आणि परळ टीटी उड्डाणपूल हे उड्डाणपूल नेमके कोणाच्या अखत्यारीत आहेत? याची माहिती घेत संबंधित प्राधिकरणांशी संवाद साधला. तत्पूर्वी ज्या उड्डाणपुलांवर खड्डे पडले आहेत; ते खड्डे बुजविण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? याबाबत महापालिका प्रशासनाशी संपर्क साधला. यावर जो उड्डाणपूल ज्या प्राधिकरणाच्या ताब्यात आहे; त्या प्राधिकरणावर संबंधित उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबई शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सायन रुग्णालय उड्डाणपूल, नानालाल डी. मेहता उड्डाणपूल, जगन्नाथ नानाशंकरशेठ उड्डाणपूल, हिंदमाता उड्डाणपूल आणि परळ टीटी उड्डाणपुलांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील जे.जे. उड्डाणपूल वगळता वरील सर्व उड्डाणपूल मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली. विशेष म्हणजे संबंधित उड्डाणपुलांवर पडलेले खड्डे बुजविण्याची जबाबदारीही महापालिकेची असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.
मुंबई महापालिकेने मात्र यापैकी कोणत्याच उड्डाणपुलावरील खड्डे बुजविलेले नाहीत. जून महिना उलटून जुलै महिना सुरू झाला असून, मुसळधार पावसाने वेग पकडला आहे. तरीदेखील काही उड्डाणपुलांवरील पेव्हर ब्लॉक आणि खड्डे बुजविण्याबाबत महापालिकेने काहीच कारवाई केलेली नाही. परिणामी, या उड्डाणपुलावरील खड्ड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून, येथील अपघातांत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सायन रुग्णालय उड्डाणपूल
पावसाळ्याआधी येथे लहान खड्डे पडले होते. परंतु जशी पावसाला सुरुवात झाली तसे या लहान खड्ड्यांचे रूपांतर मोठ्या खड्ड्यांमध्ये झाले. पावसाच्या पहिल्याच आठवड्यात खड्ड्यांमधील खडी बाहेर आली. त्याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. येथे वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे अनेक अपघात होत आहेत.
नानालाल डी. मेहता उड्डाणपूल
रस्त्यांमधील जोड पावसामुळे अधिक खोल झाले आहेत. त्यांचे रूपांतर खड्ड्यांमध्ये झाले आहे. अनेकदा वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे वाहने थेट खड्ड्यांमध्ये आपटत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मणक्याचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे रस्त्याच्या कडेला डांबर समांतर टाकण्यात आलेले नाही. त्याचाही वाहनचालकांना त्रास होत आहे.
जगन्नाथ नानाशंकरशेठ उड्डाणपूल
पावसाळ्याआधी येथील खड्डे बुजविण्यात आले होते. परंतु पावसाळ्यात पुन्हा येथे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. काही महिन्यांपूर्वी उड्डाणपुलाच्या काही भागांवर डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु हे डांबरीकरण व्यवस्थित करण्यात आले नाही. परिणामी, उड्डाणपुलावर पाणी साचून राहते. त्यामुळे रस्ता निसरडा होत असून, अपघात होण्याची भीती आहे.
हिंदमाता उड्डाणपूल
पावसाळ्याआधी छोट्या असणाऱ्या खड्ड्यांचे पावसाळ्यात मोठ्या खड्ड्यांमध्ये रूपांतर झाले आहे. खड्ड्यांमधली खडी दिवसेंदिवस बाहेर येत असून, खड्डे अधिकच मोठे व खोल होत आहेत. हिंदमाता परिसरात पाणी साचत असल्यामुळे बहुतेक वाहनचालक या उड्डाणपुलाचा वापर करतात. त्यामुळे येथे वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात आणि वाहतूककोंडीत भर पडते.
परळ टीटी उड्डाणपूल
या उड्डाणपुलावर संपूर्णत: पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले आहेत. पावसाळ्याआधी या उड्डाणपुलाची दुर्दशा झाली होती. पावसात येथील परिस्थिती अधिकच दयनीय बनली आहे. खचलेले व उखडलेले पेव्हर ब्लॉक वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. तसेच खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडत आहेत.