रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल धोक्याची घंटा, पूर्व-पश्चिम भागांना जोडणारे पूल अधिक गर्दीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 02:49 AM2017-10-04T02:49:54+5:302017-10-07T14:31:29+5:30
२३ निष्पाप जिवांचा बळी गेल्यानंतरही प्रशासन ढिम्मच असून, मुंबई महापालिकेनेही एल्फिन्स्टन रोड पूल, करी रोड स्टेशन पूल, ग्रँट रोड उड्डाणपूल, दादर येथील लोकमान्य टिळक पूल यांकडे दुर्लक्ष केले आहे.
मुंबई : एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेत २३ निष्पाप जिवांचा बळी गेल्यानंतरही प्रशासन ढिम्मच असून, मुंबई महापालिकेनेही एल्फिन्स्टन रोड पूल, करी रोड स्टेशन पूल, ग्रँट रोड उड्डाणपूल, दादर येथील लोकमान्य टिळक पूल यांकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर होत असलेली टीका वाढतच आहे़ सदर पुलांच्या सर्वेक्षणांची अंतिम प्रक्रिया नेमकी कधी पूर्ण होणार आणि सुरक्षित पूल मुंबईकरांना नेमके कधी मिळणार, असा सवाल आता मुंबईकर करू लागले आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांना महापालिकेकडून माहिती अधिकारान्वये प्राप्त माहितीतून पुलांच्या सर्वेक्षणाबाबतचे काम पूर्णत्वास गेले नसल्याचे सांगण्यात आले आहे. यादव यांच्या म्हणण्यानुसार, पालिकेने २०१२मध्ये धोकादायक जाहीर केलेले मुंबईतील सुमारे ८० ते १०० वर्षे जुने उड्डाणपूल, लहान पूल, पादचारी पुलांच्या पुनर्बांधणीबाबत वेगवान आणि अपेक्षित हालचाली झालेल्या नाहीत. महत्त्वाचे म्हणजे दोन वर्षांपूर्वी या पुलांच्या सर्वेक्षणाचा निर्णय प्रशासनाने घेतला. या कामास लागत असलेली कासवगती भविष्यात जीवघेणी ठरण्याचा धोका आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र सचिव समीर विजय शिरवडकर यांनी सांगितले की, १३६ वर्षांचा जुना ब्रिटिशकालीन हँकॉक पूल तोडून तब्बल २ वर्षे उलटली. नवीन पूल किंवा पादचारी पूल कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर नूरबाग, डोंगरी, माझगाव येथील रहिवासी तब्बल २ वर्षांपासून शोधत आहेत. १० जानेवारी २०१६ रोजी हँकॉक पूल तोडण्यात आला. येथे लवकरात लवकर नवीन पूल बांधला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र अद्याप येथील कामाला गती प्राप्त झालेली नाही. हँकॉक पूल पाडल्यानंतर नवीन पुलासाठी २८ कोटींची तरतूद करण्यात आली होती. पूल तोडल्याने माझगाव डोंगरीचा संपर्क तुटला. शाळा, कार्यालय गाठत असलेल्या रहिवाशांचा खर्च वाढला. आंदोलन, रास्ता रोको, पत्रव्यवहार करूनही काहीच दखल घेतली जात नाही, अशी खंत शिरवडकर यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वे स्थानक परिसरातून जाणारे तसेच पूर्व-पश्चिम भागांना जोडणारे पालिकेच्या अखत्यारीत ३४ उड्डाणपूल आहेत. यापैकी अनेक पूल ब्रिटिशकालीन आहेत. तरीही महापालिका या पुलांची केवळ डागडुजी करत तात्पुरती मलमपट्टी करत आहे. पुलांच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षांपूर्वी २३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. आता मात्र दुरुस्ती नको तर नव्या पुलांची गरज असून, पुन्हा दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवालही मुंबईकरांनी केला आहे.