उड्डाणपूल झाले गर्दुल्ले आणि पार्किंगचे अड्डे

By admin | Published: October 29, 2015 12:30 AM2015-10-29T00:30:16+5:302015-10-29T00:30:16+5:30

उड्डाणपुलाखाली होणाऱ्या अनधिकृत पार्किंगमुळे शहरात घातपाताची शक्यता आहे. त्यामुळे तीन वर्षांपूर्वीच न्यायालयाने शहरातील सर्व उड्डाणपुलांखालील पार्किंग बंद करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

Flyovers and parking lots | उड्डाणपूल झाले गर्दुल्ले आणि पार्किंगचे अड्डे

उड्डाणपूल झाले गर्दुल्ले आणि पार्किंगचे अड्डे

Next

मुंबई : उड्डाणपुलाखाली होणाऱ्या अनधिकृत पार्किंगमुळे शहरात घातपाताची शक्यता आहे. त्यामुळे तीन वर्षांपूर्वीच न्यायालयाने शहरातील सर्व उड्डाणपुलांखालील पार्किंग बंद करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. मात्र अद्यापही अनेक उड्डाणपुलांखाली अनधिकृत पार्किंग सुरूच असल्याचे दिसून येत आहे. कारवाईअभावी उड्डाणपूल पार्किंग माफिया आणि गर्दुल्ल्यांचे अड्डे बनले आहेत.
एमएसआरडीसीने याबाबतची सगळी माहिती देत पोलिसांना सूचनाही केल्या आहेत. मात्र पोलिसांकडून याबाबत दुर्लक्ष होत असल्याने सध्या उड्डाणपुलांखाली अनेक गैरधंदे सुरू आहेत. एखादी मोठी घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील वाहतूककोंडीच्या समस्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाहतूककोंडी कमी करण्यासाठी अनेक ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या काही प्रमाणात नक्कीच कमी झाली आहे. मात्र उड्डाणपूल तयार झाल्यानंतर त्याखाली मोठ्या प्रमाणात रिकामी जागा निर्माण झाल्या. या जागांमध्ये वाहनतळ बनवण्याची कल्पना आखण्यात आली. त्यानुसार अनेक उड्डाणपुलांखाली वाहनतळ बनवण्यात आले. मात्र गेल्या काही वर्षांत शहरात दहशतवादी हल्ले झाले आहेत. या दहशतवाद्यांच्या रडारवर शहरातील काही उड्डाणपूलदेखील होते. त्यामुळे याबाबत अनेकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर २०१२मध्ये न्यायालयाने सर्वच उड्डाणपुलांखालील वाहनतळ हटवण्याचे आदेश शासनाला दिले. त्यानंतर काही उड्डाणपुलांखालील पार्किंग हटवण्यातदेखील आले. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी हे पार्किंग सुरूच आहे.
या अनधिकृत पार्किंगसह उड्डाणपुलाखालील जागेवर गर्दुल्ले आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनी कब्जा केला आहे. या ठिकाणी दिवसभर जुगार आणि अमली पदार्थांचे सेवन केले जाते. काही ठिकाणी तर रात्रीच्या वेळी वेश्याव्यवसायही केला जात आहे. त्यामुळे या परिसरातून जाताना महिला आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.
शहरात महापालिका, एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीचे ४० ते ५० उड्डाणपूल आहेत. मात्र यातील ४ ते ५ उड्डाणपुलांचीच योग्य देखरेख ठेवली जाते. या उड्डाणपुलांखाली बगीचे तयार केले आहेत. अशाच प्रकारे इतर उड्डाणपुलांखालीही बगीचे तयार केल्यास मुंबई खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि सुंदर होईल. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष नितीन नांदगावकर यांनी पालिका आयुक्त, एमएमआरडीए मुख्य अभियंता, पोलीस आयुक्त, वाहतूक आयुक्त आणि पीडब्ल्यूडी अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार करीत पार्किंग माफियांवर कारवाईची मागणी केली आहे.

Web Title: Flyovers and parking lots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.