उड्डाणपुलांना बोगनवेलचा साज; वीस उड्डाणपुलांवर २ हजार कुंड्यांतून बहरणार बोगनवेल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 09:58 AM2024-02-09T09:58:14+5:302024-02-09T09:59:42+5:30
मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी पालिका प्रयत्नशील असते.
मुंबई :मुंबईतील वाहनधारकांचा तसेच मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी पालिका प्रयत्नशील असते. याच प्रयत्नात महापालिकेच्या उद्यान विभागानेही पुढाकार घेतला आहे. मुंबईतील २० उड्डाणपुलांवरील दुभाजकांमध्ये तब्बल दोन हजार फुलांच्या कुंड्या ठेवण्यात येणार आहेत. या कुंड्यांमध्ये लवकरच बोगलवेल बहरणार आहेत.
२ ते ४ फेब्रुवारीदरम्यान भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात उद्यानविद्या प्रदर्शन भरविले होते. या प्रदर्शनातही तब्बल १० हजार फुलांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनाला लाखो मुंबईकरांनी भेट दिली. त्यानंतर आता उद्यान विभागाने मुंबईतील २० उड्डाणपुलांची निवड करून तेथे बोगनवेल फुलांच्या २ हजार कुंड्या ठेवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबईतील प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि नयनरम्य व्हावा यासाठी उद्यान विभागाने सर्वेक्षण करून या २० उड्डाणपुलांची निवड केली आहे. ही निवड करताना तसेच या दुभाजकांमध्ये बोगनवेलीची फुलझाडे लावल्यानंतर वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.
…म्हणून बोगलवेलीची निवड
वाहनधारकास उड्डाणपुलांवरील प्रवास हा प्रसंगी रुक्ष वाटू शकतो. तसेच उन्हाच्या झळादेखील उड्डाणपुलावर अधिक लागतात. त्यामुळे उद्यान विभागाने या पुलांवरील दुभाजक पाना-फुलांनी सजविण्याचा निर्णय घेतला आहे. बोगनवेल कमी पाण्यात वाढते आणि अधिक काळ टवटवीत राहते. त्यामुळे उद्यान विभागाने बोगनवेल पर्यायाची निवड केली आहे.
या ठिकाणी बहरणार बोगनवेल :
के पूर्व विभागातील पश्चिम द्रुतगती महामार्ग, आर उत्तर विभागातील जोड रस्ता (लिंक रोड), एच पश्चिम विभागातील मीलन उड्डाणपूल, ई विभागातील लालबाग उड्डाणपूल, पी उत्तर विभागातील पश्चिम द्रुतगती महामार्ग, पी दक्षिण विभागातील पश्चिम द्रुतगती महामार्ग, आर मध्य विभागातील राष्ट्रीय उद्यान उड्डाणपूल, मागाठाणे उड्डाणपूल, सुधीर फडके उड्डाणपूल, एल विभागातील सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्ता उड्डाणपूल, नंदलाल डी. मेहता उड्डाणपूल (माटुंगा उड्डाणपूल), नाना जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपूल (दादर उड्डाणपूल), एम पूर्व विभागातील पूर्व मुक्त मार्ग, एम पूर्व विभागातील गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता उड्डाणपूल, एम पूर्व विभागातील शीव-पनवेल महामार्गावरील उड्डाणपूल, टी विभागातील पूर्व द्रुतगती महार्गावरील उड्डाणपूल, जी उत्तर विभागातील शीव-वांद्रे जोड रस्ता, जी उत्तर विभागातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, एन विभागातील पूर्व द्रुतगती महार्गावरील उड्डाणपूल, एम पश्चिम विभागातील पूर्व मुक्त मार्ग.