मुंबईच्या कारागृहात एफएम रेडिओ; महिला कैदीने बजावली रेडिओ जॉकीची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 10:09 AM2023-12-23T10:09:29+5:302023-12-23T10:09:48+5:30
कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, भायखळा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक विकास रजनलवार यांच्यासह अन्य अधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नागपूर, पुणेपाठोपाठ आता मुंबईच्या भायखळा कारागृहातही एफएम रेडिओ सेंटर कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शुक्रवारी कक्षाच्या उद्घाटना दरम्यान महिला कैदी श्रद्धा चौगुले हिने रेडिओ जॉकीची भूमिका पार पाडत कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांची मुलाखत घेतली.
कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, भायखळा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक विकास रजनलवार यांच्यासह अन्य अधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते. एफएम मुलाखतीत कारागृह विभागातील सुधारणा व सोयी-सुविधांबाबत गुप्ता यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी कारागृहातील बंदीवान यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये, हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ही सुविधा दिली गेली आहे.
म्हणून या कक्षाची स्थापना...
कारागृहामध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यांतील कैदी बंदिस्त असतात. कारागृहात येणाऱ्या प्रत्येक कैद्याच्या मनात नेहमी अस्वस्थता असते, तसेच आपला परिवार, भविष्य, विचारांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होते. यापासून थोडासा विरंगुळा म्हणून व कैद्यांना सकारात्मतेकडे नेण्याकरिता कारागृहात एफएम रेडिओ सेंटर हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे कारागृह विभागाने सांगितले.
यापुढे देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत चर्चा करून त्यांनी मार्गदर्शन केले, तसेच विदेशी कैद्यांसोबत चर्चा केली असता विदेशी कैद्यांनी कारागृहात ई-मुलाखत व इतर सोयीसुविधा सुरू केल्याबद्दल आभार मानले.