मुंबई : मुंबईच्या वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून महापालिकेचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प होऊ घातला आहे. कोस्टल रोडचे काम मुंबईकरांच्या डोळ्यांत भरत असले तरी हा मार्ग उभारताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. सी वॉल उभारणी असो की समुद्राखालील बोगद्याचे काम असो हे काम करताना प्रत्येक सेकंदाला फेसाळलेल्या समुद्राचे पाणी विघ्न निर्माण करत होते, सांगाड्यात शिरत होते, अशी माहिती येथे काम करणाऱ्या अभियंत्यांनी दिली.
कोस्टल रोडचे काम २०१८ पासून सुरू करण्यात आले असून कोरोनाकाळात हे काम बंद होते. दिवस आणि रात्र अशा दोन शिफ्टमध्ये ३५०० कामगार या ठिकाणी काम करत असून या प्रकल्पासाठी १११ हेक्टर जागेवर सुमारे ८ लाख ८० हजार क्युबिक मीटर इतकी भरणी घालण्यात आली आहे. १ लाख ४० हजार ट्रकच्या फेऱ्यांद्वारे ही भरणी घालण्यात आली असून ४० हेक्टर कोस्टल रोडच्या रस्त्याकरिता तसेच उर्वरित भरणी ही हिरवळ, रिक्रियेशन यासाठी वापरण्यात आली आहे.
दुबई, नेदरलँड याठिकाणी सॅन्ड रेझिंग पद्धत म्हणजेच समुद्रातील वाळू काढून त्याच ठिकाणी रेक्लेमेशन बांधकामासाठी वापर केला जातो तर मुंबईत कोस्टल रोड बांधताना मात्र स्टोन रेझिंग म्हणजेच विविध आकाराचे दगड रेक्लमेशनसाठी वापरण्यात आले आहे. हे खडक नवी मुंबईहून मुंबईत आणणे आणि ते योग्य त्या ठिकाणी बसवणे हे जिकीरीचे काम असल्याचे उपअभियंता विजय झोरे यांनी सांगितले. प्रचंड वारा खवळलेला समुद्र आणि पाऊस पाहता काम करणे हे आव्हानात्मक असल्याचे ते सांगायला विसरले नाहीत. १८ तासांपैकी केवळ १२ तासच प्रत्यक्ष काम करायला मिळायचे, असे त्यांनी सांगितले.
मावळ्याचा वेग कमी करायचो कोस्टल रोडच्या गिरगाव चौपाटी येथून प्रियदर्शनी पार्क येथे ३.५ किमी लांबीचे दोन बोगदे मावळा या टीबीएम मशीनद्वारे खणण्यात आले आहेत. हे बोगदे समुद्राखालून गेले असून बोगद्याच्या वर काही ठिकाणी हेरिटेज वास्तू असल्याने बोगदा खणणे हे एक टास्क होते. बोगदा खोदताना समुद्राचे पाणी झिरपणार तर नाही ना अशी भीती वाटायची तसेच हेरिटेज वास्तूंना धक्का बसू नये यासाठी मावळ्याचा वेग कमी करावा लागायचा, अशी माहिती एलएन्डटीचे कन्स्ट्रक्शन मॅनेजर माणिक भटनागर यांनी दिली.