नवी मुंबई : शिवसेना-भाजपा युतीने आपल्या वचननाम्यात पाच वर्षे करवाढ न करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, पालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या जुन्याच योजनांचा उल्लेख वचननाम्यात दिसत आहे. नवीन प्रकल्पांपेक्षा जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला असून भ्रष्टाचारविरहित कामकाज केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी युतीचा वचननामा जाहीर करण्यासाठी वाशीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, विजय नाहटा, भाजपा आमदार मंदा म्हात्रे, संजय केळकर यांनी याविषयी माहिती दिली. वचननाम्यात मंंडयांचा विकास, चांगले बस थांबे, जाहिरात धोरण निश्चित करण्याचा उल्लेख आहे. आंबेडकर भवनाचे काम पूर्ण करण्यात येईल. नेरूळ, ऐरोली व बेलापूरमधील रखडलेल्या रुग्णालयांचे काम पूर्ण करून ती सुरू करण्यात येतील. संगीत विद्यालय, वाचनालय व अभ्यासिका सुरू करण्यात येणार असल्याचे वचननाम्यात स्पष्ट केले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, नवीन मैदानांची निर्मिती, शहरात पर्यटनस्थळे विकसित करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मोरबे धरण परिसरात हॉटेल व पर्यटनस्थळ विकसित करण्यावर भर दिला आहे. वैद्यकीय महाविद्यालय, सौर ऊर्जा प्रकल्प, स्पर्धा परीक्षा केंद्र, संगीत महाविद्यालय, विज्ञान तारांगणही करण्यात येणार आहे. ‘नवी मुंबईत यावेळी सत्ता परिवर्तन होणार आहे. येथील भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये युतीच्या मतांची संख्या सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त आहे, असेही यावेळी शिंदे यांनी सांगितले. आमदार मंदा म्हात्रे यांनीही शहरात एफएसआयचा प्रश्न, गरजेपोटी घरांचा प्रश्न सरकारने सोडविल्याचे सांगितले. यावेळी वैभव नाईक, मनोहर गायखे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. बंडखोरांची यादी मातोश्रीकडे शिवसेनेच्या अनेक उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. भाजपाला दिलेल्या प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असून, त्यांची यादी तयार करून कारवाईसाठी मातोश्रीकडे पाठविण्यात आली असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. स्थानिक नेत्यांना स्थान नाही वचननाम्यावर भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे, वैभव नाईक यांचे छायाचित्र आहे. परंतु जिल्हा अध्यक्ष दिसत नाहीत. शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार व उपनेत्यांचे छायाचित्र आहेत. परंतु एकाही स्थानिक नेत्याचे छायाचित्र नाही. तुलना करण्यास टाळाटाळ नवी मुंबईचा विकास प्रशासनाने केल्याचे विजय नाहटा यांनी सांगितले. परंतु ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये जास्त समस्या आहेत. तिथे तुमच्या पक्षाने का विकास केला नाही या प्रश्नावर मात्र त्यांनी उत्तर देणे टाळले. कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडविषयी योग्य निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
जुन्याच योजनांवर युतीचा भर
By admin | Published: April 17, 2015 12:26 AM