सुसाट वाहतुकीसोबत पायाभूत सुविधांवर भर, मुंबई महानगरपालिकेकडून नवीन वर्षात जोरदार प्लानिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 04:28 AM2018-12-23T04:28:04+5:302018-12-23T04:28:27+5:30
आगीचे सत्र, एफएसआय आणि भूखंड घोटाळा तर वर्ष सरता-सरता ओढावलेली पाणीटंचाई. यामुळे हे वर्ष मुंबई व महापालिकेसाठीही त्रासदायकचं ठरले.
- शेफाली परब-पंडित
मुंबई : आगीचे सत्र, एफएसआय आणि भूखंड घोटाळा तर वर्ष सरता-सरता ओढावलेली पाणीटंचाई. यामुळे हे वर्ष मुंबई व महापालिकेसाठीही त्रासदायकचं ठरले. मात्र नवीन वर्षात गुड न्यूज देण्यासाठी महापालिकेने जोरदार प्लॅनिंग केले आहे. कोस्टल रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवून धावत्या मुंबईचा प्रवास सुसाट केला जाणार आहे. त्याचबरोबर दोन हजार दशलक्ष लीटर जादा पाणी, फेरीवाल्यांचे पुनर्वसन, प्लॅस्टिकमुक्त मुंबईची भेट मुंबईकरांना पुढच्या वर्षभरात मिळणार आहे.
फेरीवाल्यांचे पुनर्वसन
मुंबईतील पदपथ नवीन वर्षात फेरीवालामुक्त होणार आहेत. या धोरणांतर्गत फेरीवाल्यांना जागांचे वाटप होणार आहे. २०१४ मध्ये ९९ हजार ४३५ फेरीवाल्यांनी अर्ज केला. २२१ फेरीवाला क्षेत्रांत २२ हजार जागा त्यांच्यासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. फेरीवाल्यांच्या कागदपत्रांची छाननी करून सात परिमंडळीय शहर फेरीवाला समिती आपली शिफारस आणि टिपणी शहर नियोजन समितीकडे सादर करणार आहेत. त्यानंतर पुढच्या वर्षीपासून फेरीवाल्यांना जागेचे वाटप होणार आहे. फेरीवालामुक्त परिसर झाल्याने नागरिकांनाही चालायला मोकळा रस्ता मिळणार आहे.
प्लॅस्टिकमुक्त मुंबई
२३ जूनपासून मुंबईत प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली. मात्र सहा महिन्यांत ही कारवाई बारगळली आहे. मात्र नवीन वर्षात नव्या जोमाने प्लॅस्टिकला मुंबईतून हद्दपार करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. ही कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी फेरीवाले आणि दुकानदारांकडे प्लॅस्टिक पिशव्या आढळल्यास त्या परिमंडळातील संबंधित अधिकाऱ्यालाच जबाबदार ठरवून कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे भविष्यात ‘प्लॅस्टिकमुक्त मुंबई’ पाहायला मिळणार आहे.
वाहतूककोंडीतून मुंबईकरांची सुटका
गेल्या काही वर्षांत धावत्या मुंबईच्या वेगाला वाहतूककोंडीचा ब्रेक लागला आहे. या कोंडीत तासन्तास खोळंबून राहणाºया मुंबईकरांचा प्रवास कोस्टल रोडमुळे सुसाट होणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली असा २९ कि़मी.च्या कोस्टल रोडचे काम नवीन वर्षात सुरू होत आहे.
दोन हजार दशलक्ष लीटर जादा पाणी
मुंबईची गरज आणि तलावांमधील जलसाठ्यात यंदा १५ टक्के तफावत आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र मुंबईत आत्ताच पाणीबाणी निर्माण झाली आहे. पुढच्या उन्हाळ्यात याची झळ आणखी बसणार आहे. मात्र गेली अनेक वर्षे रखडलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून मार्च-एप्रिल २०१९ मध्ये मुंबईला दोन हजार दशलक्ष लीटर जादा पाणी पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी मिळणार आहे.
पायाभूत प्रकल्प व नागरी सुविधांना प्राधान्य
मुंबईच्या पायाभूत सुविधेचा दर्जा उंचविणाºया कोस्टल रोडसारख्या प्रकल्पाला पुढील वर्षभरात वेग मिळेल. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने अर्थातच प्राधान्याने या प्रकल्पाचे काम सुरू राहील. त्याचबरोबर नागरी सुविधांमध्ये सुधारणा करून मुंबईकरांची गैरसोय दूर करण्यावर भर असेल.
- अजोय मेहता, महापालिका आयुक्त
मानवी दृष्टिकोनातून मुंबईत सर्वांना पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र यासाठी पाणीपुरवठ्यातील विषमता दूर झाली पाहिजे. सांडपाणी पुन:प्रक्रिया प्रकल्पाला वेग मिळावा. तसेच मुंबईतील २२४ नैसर्गिक तलावांचेही जतन व्हावे.
- सीताराम शेलार,
जलतज्ज्ञ