उत्तर-मध्य मतदारसंघातील पाच लाख मराठी मतांमुळे मनसेच्या भूमिकेकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 01:33 AM2019-04-21T01:33:10+5:302019-04-21T01:34:12+5:30
कार्यकर्ते मात्र संभ्रमात; काँग्रेसकडे मते वळण्यासाठी राज यांचा आधार
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या थेट विरोधात भूमिका घेऊन मोदी शाह जोडीला घरी पाठवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मात्र याबाबत काहीसा संभ्रम असल्याचे चित्र आहे.
उत्तर मध्य मतदारसंघातील निवडणूक प्रचार आता रंगू लागला असून सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक बऱ्यापैकी चुरशीची होऊ लागली आहे. भाजपच्या पूनम महाजन व कॉंग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यामध्ये चुरस वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत मनसेच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे दोन्ही पक्षांचे लक्ष लागले आहे. उत्तर मध्य मतदारसंघातील साडेसोळा लाख मतदारांपैकी सुमारे ५ लाख मतदार मराठी आहेत त्यामुळे या मतांना मनसेच्या माध्यमातून कॉंग्रेसकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
याबाबत, मनसेचे प्रदेश सचिव प्रमोद पाटील म्हणाले, मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे मोदी व शाह यांच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र आम्ही थेट कोणत्याही उमेदवाराला मते द्या म्हणून आवाहन केलेले नाही. आम्ही कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांना पाठिंबा दिलेला नाही. आम्ही केवळ मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कालावधीत देशात घडलेल्या घटना नागरिकांसमोर मांडून मोदी शाह यांच्या विरोधात उत्तम उमेदवाराला मते देण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. आम्ही कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीचे प्रचारक नाही, असा पवित्रा पाटील यांनी घेतला. आम्ही मोदी व शाह यांच्या विरोधात सक्षम उमेदवाराला मतदान करण्याचा प्रचार करत आहोत.
‘पक्ष आदेशाप्रमाणे मतपरिवर्तनाचे प्रयत्न’
कुर्ला विधानसभा अध्यक्ष नरेश केणी यांनी मनसे कार्यकर्त्यांना कॉंग्रेस उमेदवारांकडून प्रचारामध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण आले असल्याची माहिती दिली. कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत मनसे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असल्याची माहिती केणी यांनी दिली. पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही मतदारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कुर्ला विधानसभा क्षेत्रात सुमारे २० हजार मतदान मनसेतर्फे भाजपविरोधात होईल, असा दावा त्यांनी केला. कुंपणावर असलेल्या मतदारांचे मतपरिवर्तन आम्ही घडवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.