मनसेच्या 'नवनिर्माणा'साठी सहा 'M' चा मास्टर प्लॅन; राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 01:25 PM2022-10-11T13:25:03+5:302022-10-11T13:47:06+5:30
दसरा मेळाव्यात केवळ चिखलफेक होत होती. याठिकाणी कुठलेही विचार मांडले गेले नाहीत. त्यामुळे मनसेचे जे विचार मराठी माणूस, हिंदुत्वासाठी आहेत ते लोकांपर्यंत पोहचवावे असं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले.
मुंबई - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत स्वबळावर लढण्याची तयारी करा, मनसेकडे लोक पर्याय म्हणून पाहत आहेत असा आदेश कार्यकर्त्यांना दिला. त्याचसोबत ६ एमवर लक्ष केंद्रीत करा असा कानमंत्रही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला.
राज ठाकरे(MNS Raj Thackeray) म्हणाले की, मी तुम्हाला सत्तेच्या खुर्चीवर बसवणार आहे. स्वत: सत्तेच्या खुर्चीवर उडी मारून बसणार नाही. आपल्यापैकी एक सत्तेत असेल. आत्ताच्या राजकारणाला लोक कंटाळली आहे. त्यामुळे मनसेकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे आपले विचार सकारात्मक ठेवा. लोकांपhर्यंत पोहचा असं त्यांनी सांगितले.
'६ एम फॉर्म्युला'
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आजच्या बैठकीत '६ एम'चा फॉर्म्युला कार्यकर्त्यांना देत त्यावर लक्ष केंद्रीत करा असं म्हटलं. हे ६ एम म्हणजे मेसेज, मेसेंजर, मनी, मसल, माईंड आणि मॅकेनिक असं त्यांनी म्हटलं. मॅकेनिक म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करा. मेसेज म्हणजे आपले विचार मेसेंजरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवावे. मसल म्हणजे आपल्या ताकदीने लोकांपर्यंत जात आपले विचार त्यांच्यापर्यंत घेऊन जा आणि मनी लागेल तो आपण उभा करू, निवडणूक जिंकू असं बैठकीत सांगितले.
दरम्यान, दसरा मेळाव्यात केवळ चिखलफेक होत होती. याठिकाणी कुठलेही विचार मांडले गेले नाहीत. त्यामुळे मनसेचे जे विचार मराठी माणूस, हिंदुत्वासाठी आहेत ते लोकांपर्यंत पोहचवावा. ग्राऊंड पातळीवर लोक पर्याय शोधत आहेत. सहानुभूती मिळत नाही. त्यामुळे सकारात्मक विचार लोकांपर्यंत घेऊन जावेत असंही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले.
शिवसेनेत सुरू असलेल्या वादातून सध्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. त्यात ४० आमदार, १२ खासदार हे एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना गटात गेले आहेत. तर उरलेले आमदार, खासदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत राहिले आहेत. अलीकडेच केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव गोठवलं त्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. मनसे प्रवक्त्यांनीही त्यावर भाष्य केले. परंतु राज ठाकरेंनी धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याबाबत कुणीही प्रतिक्रिया मांडू नका, मी यावर पक्षाची भूमिका मांडेन असं सांगत मनसे नेते, कार्यकर्त्यांना मौन बाळगण्याचे आदेश दिले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"