- मिलिंद भारांबे, वाहतूक सह पोलीस आयुक्तमोठ्या प्रमाणात होत असलेली वाहतूककोंडी, दिवसेंदिवस सतावणारी पार्किंग समस्या, वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन आणि वाहतूक पोलिसांना भेडसावणारे प्रश्न नेहमीच आपल्यासमोर येतात. पण यातून मुंबईकरांची सुटका करतानाच वाहतुकीचे नियोजन कसे करता येईल आणि त्याचबरोबर पोलिसांच्या समस्याही कशा सोडविता येतील यासह अनेक प्रश्नांवर वाहतूक, सह पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांच्याशी लोकमतने कॉफी टेबलच्या माध्यमातून संवाद साधला. या वेळी त्यांनी मुंबईतील पार्किंगसारखी मोठी समस्या सोडविण्यासाठी ‘आॅन स्ट्रीट पार्किंग’ म्हणजेच ‘रस्त्यावरील पार्किंग’सारखी नवी संकल्पना आखत असल्याचे सांगितले.मुंबईत वाहतूक नियमांच्या होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वेगाने वाहन चालविण्याच्या गुन्ह्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे अपघाताचा धोका बराच संभवतो. ते रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांचे नियोजन काय आहे?राज्य शासनाकडून ६000 कॅमेरे मुंबईत बसविण्यात येणार आहेत, तर २३७ कॅमेरे मुंबई पालिकेकडून बसविण्यात आलेले आहेत. त्यांची मदत वाहतूक पोलिसांना होत असतानाच अतिजलद व बेदरकार वाहनांना रोखण्यासाठी आमच्याकडूनही सीसीटीव्हींचे नियोजन आखण्यात आले आहे. यात आरएलव्हीडी आणि स्पीड कॅमेरे बसविण्यात येतील. आरएलव्हीडी म्हणजे रेड लाइट वायोलेशन डिटेक्शन. सिग्नलजवळील रेड लाइट वाहनाने ओलांडताच त्या ठिकाणी बसविण्यात आलेला कॅमेरा वाहनाचा फोटो काढेल आणि त्याची माहिती वाहतूक पोलिसांना मिळेल. याचबरोबर स्पीड कॅमेरे बसविण्याचे नियोजनही आखण्यात आले असून असे बेदरकार वाहन या कॅमेऱ्यात कैद होईल आणि त्याद्वारेही वाहन व चालकाला शोधणे शक्य जाईल. या दोन्ही कॅमेऱ्यांमुळे वाहनचालकाला वाहन चालविण्याची शिस्त लागेल. महत्त्वाचे म्हणजे आमच्याकडून ई-चलान सेवाही पुढील महिन्यात सुरू केली जात आहे. एखाद्या चालकावर दंडात्मक कारवाई केल्यानंतर त्याच्याकडून त्वरित पैसे भरले जातात आणि पावती दिली जाते. मात्र ही सेवा हद्दपार करताना आम्ही चालकाला ई-चलान देण्याचा निर्णय घेतला आहे. ई-चलानमध्ये क्रेडिट कार्ड, पे-टीएम, डेबिट कार्डद्वारे चालक पैसे भरू शकतो. सध्या किरकोळ गुन्ह्यांमध्ये चालकांंच्या लायसन्सचे निलंबन वाढले आहे. अशामुळे चालकांना शिस्त लागेल का?सर्वोच्च न्यायालयाची एक समिती असून त्यांच्याकडून वाहन शिस्तीचे सर्व राज्यांना आदेश गेले आहेत. त्यानुसारच सर्व वाहतूक नियमांबाबतीतील आणि गुन्ह्यांबाबतीत ३१ डिसेंबर २0१५ रोजी आपल्या परिवहन विभागाने एक अध्यादेशही काढला आहे. यात सहा गोष्टी नमूद असून त्याचेच पालन केले जात आहे. यामध्ये चालकाने वाहतूक नियम मोडल्याचा पहिला गुन्हा जरी केला असेल तरीही लायसन्स निलंबित करता येते. हे काम आरटीओचे आहे. पण यात वाहतूक पोलीसही त्यांना सहकार्य करत आहेत. अशा प्रकारच्या कारवाईमुळे वाहनचालकांना चांगल्या प्रकारे शिस्त लागत आहे आणि ती आणखी लागेल, अशी अपेक्षा आहे. मुंबईतील वाहतूककोंडी कशाप्रकारे सुटेल?वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन झाले पाहिजे. वायुप्रदूषण सोडविण्यासाठी व रस्त्यावरील वाहने कमी करण्यासाठी दिल्लीत आॅड इवन फॉर्म्युला राबविण्यात आला. परंतु मुंबईत अशा फॉर्म्युल्याची गरज नाही. कारण आपल्याकडील वाहन संख्या आणि हवामानाची स्थिती तशीनाही. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सुधारणे हेच महत्त्वाचे आहे. आपल्याकडील बस सेवा चांगल्या असल्या तरी त्यांचे प्रवासीही कमी होत आहेत. त्याचा विचारही होणे गरजेचे आहे. उच्च व मध्यमवर्गाकडे मोठ्या प्रमाणात वाहने असून त्यांना सार्वजनिक वाहतूक कशी उपलब्ध करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. लोकांना वाहतुकीचे चांगले पर्याय उपलब्ध झाले तर नक्कीच वाहतूककोंडी सुटेल. पार्किंग समस्या खूपच मोठी होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का?मुंबईतील पार्किंग समस्येचा प्रश्न खूपच मोठा आहे. ती समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मुंबई महापालिकेच्या साहाय्याने प्रयत्न सुरू आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात असे रस्ते आहेत ज्या ठिकाणी वाहनांची वर्दळच नाही आणि असली तरी ती फारच कमी आहे. अशा रस्त्यांवरच पार्किंगची व्यवस्था पालिकेच्या साहाय्याने केली जाणार आहे. या जागा शोधण्यात आल्या असून त्यावर काम सुरू आहे. मुंबईत अशा प्रकारच्या जागा मोठ्या प्रमाणात आहेत. येत्या पार्किंग धोरणात हे नियोजन मंजूर होईल आणि मे महिन्यापासून ही सेवा मुंबईकरांसाठी येईल, यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहोत. या सेवेला आम्ही ‘आॅन स्ट्रीट पार्किंग’ हे नाव दिले आहे. ही सेवा आल्यास पार्किंगची बरीच समस्या सुटेल. फक्त शासनाची मंजुरी आवश्यक आहे. जे.जे. उड्डाणपुलावर सध्या दुचाकीस्वारांना बंदी घालण्यात आली आहे. त्यांना उड्डाणपुलाखालूनच जाण्याचा पर्याय असल्याने वाहतूककोंडी होते. त्यामुळे त्यांचा प्रश्न कसा सोडवाल?बेदरकारपणे दुचाकी चालविण्यात येत असल्याने जे.जे. उड्डाणपुलावर जाणाऱ्या चालकांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळेच न्यायालयाच्या परवानगीने या उड्डाणपुलावरून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. दुचाकीस्वारांना होत असलेली अडचण आम्ही समजू शकतो. या पुलावर बेदरकार व जलद वाहनांना रोखण्यासाठी ‘स्पीड कॅमेरे’ बसविण्याचे नियोजन आहे. ते बसवून झाल्यानंतर अभ्यास करून परिस्थितीनुरूप यावर विचार केला जाईल. दुचाकीस्वारांनी आपला जीव महत्त्वाचा असून सुरक्षित प्रवास अवलंबिला पाहिजे. वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर बराच ताण पडत आहे. हा ताण कसा कमी कराल?ट्रॅफिक वॉर्डन (मदतनीस, रक्षक) ही संकल्पना आम्ही राबवत आहोत. त्याची बरीच मदत होत आहे. पालिकेकडून एक हजार वॉर्डन येत्या दोन ते तीन महिन्यांत मिळतील. तर २५0 वॉर्डन नगरसेवकांकडून मिळालेले आहेत. सध्या जवळपास तीन हजार वॉर्डन असून त्यांची संख्या अजून वाढविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आमच्या वाहतूक पोलिसांच्या असलेल्या तीन हजारच्या मनुष्यबळाला त्याची मदत होत जाईल. या वॉर्डनकडून वाहतूककोंडी सोडविण्यासाठी व पार्किंग हाताळण्यासाठी मदत होते. वाहतूक पोलिसांसाठी असणाऱ्या चौक्यांचीही दुरवस्था झाली आहे. याबाबत काही उपाययोजना करत आहात का?सध्या असलेल्या चौक्यांची अवस्था सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मुंबई महानगरपालिकेच्या साहाय्याने दोन हजार चौरस फुटांच्या चौक्या वाहतूक पोलिसांसाठी बांधून मिळणार आहेत. साधारपणे पुढील वर्षापर्यंत हे काम पूर्ण होईल आणि हा महत्त्वाचा प्रश्न सुटेल. यामध्ये त्यांच्यासाठी सुविधाही असतील. त्याचबरोबरच वाहतूक पोलीस ठिकठिकाणी उभे राहून वाहतुकीचे नियोजन करत असतात. ते करताना त्यांना वायुप्रदूषणाचा सामना करावा लागतो. यातून बचाव करण्यासाठी आम्ही वाहतूक पोलिसांच्या वाहनांमध्ये ‘आॅक्सिजन सिलिंडर’ उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी संस्थांमार्फत ही सेवा पोलिसांना दिली जाईल. यात वाहतूक पोलीस गाडीत जाऊन आॅक्सिजन तोंडाला लावून फ्रेश हवा घेऊ शकतो. यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळेल. येत्या दोन ते तीन महिन्यांत ही सेवा सुरू केली जाईल. वाहतूक पोलिसांच्या ३४ गाड्यांमध्ये हे सिलिंडर बसविले जातील. वाहतूक पोलिसांना वाहनचालकांकडून मारहाणीचे प्रकार होतात. ते कसे रोखले जातील?वाहनचालकाने नियमांचे उल्लंघन केल्यानंतर त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाईचे आम्ही आदेश दिलेले आहेत. जर एखाद्या चालकाकडून वाहतूक पोलिसावर हल्ला झालाच तर त्यावर गुन्हा दाखल करण्याची कायद्यात तरतूद आहे आणि न्यायालयाकडूनही तशी शिक्षा ठोठावण्यात येते. जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि त्यांना चाप बसावा यासाठी आमच्याकडून नेहमीच प्रयत्न होतात.(मुलाखत : सुशांत मोरे)
पार्किंग समस्या सोडवण्यावर भर
By admin | Published: April 10, 2016 2:28 AM