लक्ष दिव्यांचे तेज लेवूनी आली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 03:50 AM2017-10-15T03:50:37+5:302017-10-15T03:50:56+5:30

एकदा अस्ताला जाणा-या सूर्याला वाटले की मी अस्ताला गेलो तर सर्वत्र अंधकार पसरून हाहाकार माजेल. मग हा अंधार दूर कोण करील...? कोठूनही पडसाद येईना.

The focus was on the light of the lights ... | लक्ष दिव्यांचे तेज लेवूनी आली...

लक्ष दिव्यांचे तेज लेवूनी आली...

Next

- मनीषा मिठबावकर

एकदा अस्ताला जाणाºया सूर्याला वाटले की मी अस्ताला गेलो तर सर्वत्र अंधकार पसरून हाहाकार माजेल. मग हा अंधार दूर कोण करील...? कोठूनही पडसाद येईना. तेव्हा एक पणती धिटाईने पुढे आली आणि म्हणाली की, ‘मी सगळा अंधकार दूर करू शकणार नाही, पण मी तेवत राहीन. प्रकाशाने अंधकार भेदला जातो यावर लोकांचा विश्वास जागता ठेवीन...’ कवी रवींद्रनाथ टागोर यांची ‘मी तेवत राहीन’ ही कविता प्रकाश, आशा, जिद्द, संघर्षाशी नाते साधणारी आहे आणि याच नात्याची जाणीव दीपावलीचा सण करून देतो. दु:ख, संकट, निराशेवर मात करीत आयुष्यात येणाºया नव्या कवडशांच्या स्वागतासाठी आशेचा एक तरी दीप उजळवायलाच हवा, याची जाणीव करून देतो.

स्वच्छ सारवलेले अंगण, त्यावर विविध रंगांची उधळण करणारी रांगोळी, दारावर लटकणारा आकाशकंदील आणि घराच्या उंबरठ्यावर दिमाखाने तेवणाºया, आपल्या मिणमिणत्या प्रकाशाने सभोवार तेजाची किरणे पसरविणाºया पणत्या... म्हणजे दिवाळीची आनंददायी, प्रसन्न, मंगलमय चाहूल. मात्र, हळूहळू दीपावलीचे हे प्रसन्न रूप महाग होऊ लागले आहे. नोटाबंदीमुळे साठवलेल्या पैशांचेच दिवाळे निघालेय. पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच आहेत. जीवनावश्यक वस्तूंचेही भाव वाढलेत. केवळ वस्तूंनाच नव्हे तर माणसांनाही ‘भाव’ आलाय. पैशांमागे धावताना कुठे तरी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माणुसकी हरवत चालल्याची खंत प्रकर्षाने जाणवते. त्यामुळेच आजकाल आपण वरकरणी बोलतो फार, पण इतरांवर आपुलकी, माया क्वचितच करतो आणि तिरस्कार मात्र सहज करतो. भलेही आपण वर्षभरातून एकदा का होईना, पण सहलीला जातो, मात्र शेजारी आलेल्या नव्या माणसाला भेटण्याइतकी सवड आपल्याकडे नाही.
आज आपले घर विविध वस्तूंनी सजले आहे, पण घरकुलं दुभंगलीत. पैशांमागे लागलेल्या अनेकांनी प्रतिष्ठा, प्रसिद्धीची उंची गाठली खरी, पण नाती मात्र उथळ झाली आहेत. यातूनच अल्पवयीन मुला-मुलींवरील अन्याय, अत्याचार वाढतच चालले आहेत. त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेली लोकशाही येथे नांदत असली तरी सत्तेच्या स्वार्थापायी राजकारणी काही गुण्यागोविंदाने नांदायला तयार नाहीत. त्यामुळेच राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे, पक्षांतराचे फटाके वरचेवर फुटत आहेत. केवळ सुल्तानीच नव्हे तर अस्मानी संकटांचे ढगही गडद होऊ लागलेत. म्हणूनच तर आॅक्टोबर हीट सुरू झाली तरी पाऊस काही परतीचे नाव घ्यायला तयार नाही.
चित्र असे काळजीचे असले तरी नित्यनेमाप्रमाणे दिवाळी ही साजरी होणारच. किंबहुना ती साजरी करायलाच हवी. आयुष्यात येणाºया नव्या कवडशांच्या स्वागतासाठी आशेची निरांजने पेटवायलाच हवीत. कारण दिवाळी हा सण मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो निसर्गाशी मेळ साधतो. कौटुंबिक स्नेहबंधांना उजाळा देतो. पौराणिक, ऐतिहासिक घटनांशी नाते सांगतो आणि अज्ञानाच्या, असंस्कृततेच्या अंधारातून सुबत्तेच्या, सुसंस्कृततेच्या प्रकाशाकडे झेप घेण्याची इच्छा मनामनात जागवतो. दिवाळीत घरोघरी तेवणारे असंख्य दीप अमावस्येचा अंधार दूर करून तेजोमय प्रकाश अवनीतलावर अवतरावा म्हणून आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. धनत्रयोदशीपासून खºया अर्थाने दिवाळीचे सुंदर रूप सर्वत्र जाणवू लागते. दारावर टांगलेले आकाशकंदील, मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात घराच्या दरवाजाबाहेरचा छोटासा कोपरा गेरूने रंगवून त्यावर काढलेली छोटीशी रांगोळी, विविध प्रकारच्या पणत्या, रोषणाई अशा दिवाळीतील नेत्रसुखद गोष्टींचे दर्शन साºयांनाच मंगलमय वातावरणात घेऊन जाते.
पूर्वी दिवाळीच्या आठ-पंधरा दिवस आधीपासून गृहिणी लाडू, करंज्या, चकल्या असे फराळाचे पदार्थ बनवण्यात मग्न असायच्या. घरातील वडीलधारी मंडळीही घरातच कंदील बनवायची. बालगोपाळही यात खारीचा वाटा उचलायचे. परंतु सध्याच्या धावपळीच्या काळात घरातल्या घरात कंदील बनवण्याइतका वेळ वडीलधाºयांकडे नाही. त्यामुळे पूर्वी कलाकुसरीचे जे बाळकडू मुलांना घरातच मिळत होते ते हळूहळू दुरापास्त होऊ लागते आहे. आजच्या घडाळाच्या काट्याप्रमाणे धावणाºया त्रिकोनी किंवा चौकोनी कुटुंब पद्धतीत जेथे आईवडील दोघेही कामाला जातात तेथे आकाशकंदील काय किंवा फराळ काय, काहीही करायला त्यांना वेळ नाही. अशा वेळी रांगोळी, आकाशकंदील बनवणाºया शिबिरांमध्ये मुलांना प्रवेश घेऊन दिला जातो. ‘रेडीमेड’ फराळाचा आधार घेतला जातो. शेवटी काय तर उत्सव साजरा करणे महत्त्वाचे! शिवाय दिवाळीनिमित्त अनेक ठिकाणी रांगोळीचे, फराळाचे प्रदर्शन भरविले जाते. त्यामुळे आपसूकच संस्कृतीची, कलेची देवाण-घेवाण अजूनही कायम आहे.
थोडक्यात काय तर दिवाळी हा सण आनंदाचा, गोडधोड खाण्याचा, विविधतेतून एकतेचे दर्शन घडवणाºया रांगोळीच्या रंगांप्रमाणेच दुभंगलेल्या नात्यातील प्रेमाचे रंग सांधण्याचा सण आहे. जीवनात संकट, दु:खरूपी अंधार आहे म्हणूनच तर प्रकाशणा-याला संधी आणि महत्त्व आहे, याची जाणीव दिवाळीमुळेच नव्याने होते. त्यामुळेच आता खरी गरज आहे ती केवळ उथळपणे दीपोत्सव साजरा करण्यापेक्षा या सणामागील आशय जाणून घेऊन त्यानुरूप वाटचाल करण्याची. तरच खºया अर्थी मनात प्रज्वलित झालेला सुख-समृद्धी, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आशा-आकांक्षांचा दीप आयुष्यातील दु:ख, संकट, निराशेचा अंधकार दूर करण्यासाठी सतत प्रत्येकाच्या घरात, आयुष्यात किंबहुना मनामनात कायम तेवत राहावा, हीच दीपावलीनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!

Web Title: The focus was on the light of the lights ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :diwaliदिवाळी