पावसाचे धूमशान सुरूच, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 08:58 AM2021-09-09T08:58:50+5:302021-09-09T09:00:06+5:30
मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर, पूरग्रस्त भागात शेकडो संसार उघड्यावर
मुंबई : राज्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला. सलग सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली असून नदीकाठची कित्येक हेक्टर शेतजमीन खरवडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.
नाशिक, जळगाव, धुळ्यात अतिवृष्टी
अतिवृष्टीने नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव तालुक्यात प्रचंड नुकसान झाले. नांदगावमध्ये पुराचे पाणी घरात घुसून शेकडो संसार उघड्यावर आले. रेल्वेच्या १६० वर्षांच्या काळात प्रथमच नांदगावच्या प्लॅटफॉर्मला पाणी लागले. अनेक घरांचे पहिले मजले पाण्यात बुडाले. पुराच्या तडाख्यात नदी किनाऱ्यावरील घरे, छोट्या व्यावसायिकांची दुकाने वाहून गेली. ढगफुटीसदृश पावसाने चाळीसगाव व भडगाव परिसरातील दोन गावांमध्ये पाणी शिरले होते. धुळे व नेर येथे अतिवृष्टी झाली तर नंदुरबार जिल्ह्यात पुराच्या पाण्यात बुडाल्याने एक तरुण वाहून गेला. चांदसैली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वादळी पावसामुळे ऊस, केळी व पपई या पिकांचे नुकसान झाले.
तहान भागली; पिकाचे नुकसान
औरंगाबाद : मराठवाड्यात जवळपास चार दिवसांपासून दमदार पावसाने मुक्काम ठोकला असून जायकवाडी, मांजरा धरणांचा अपवाद वगळता छोटे-मोठे सर्व प्रकल्प तुडुंब भरले आहेत. या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि कृषी सिंचनाचा प्रश्न मिटला असला तरी खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात जवळपास १८ हजार ३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सुमारे बावीसशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यात सुमारे एक लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली आहेत. नांदेड जिल्ह्यात २४ तासांत चार जण दगावले. मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या कुटुंबातील दोन सदस्य मंगळवारी कारसह वाहून गेले होते. बुधवारी सकाळी नदीपात्रात त्यांचे मृतदेह आढळून आले. लातूर जिल्ह्यात सहा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.
आजोबा-नातवाची सुटका
माजलगाव धरणाच्या पायथ्याशी देवखेडा येथे आजोबा व नातवास अचानक पाणी आल्याने १२ तास झाडावर बसून काढण्याची वेळ आली. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या जवानांची बोटच उलटली. ते वाहून जात असताना त्यांनी झाडांना पकडल्याने त्यांचे प्राण वाचले.
ढगफुटीसारखा पाऊस
औरंगाबाद शहरात मंगळवारी रात्री तासभर ढगफुटीसारखा पाऊस झाला. या पावसाने व्यापाऱ्यांचे तब्बल ४० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुकाने, गोदामात कंबरभर पाणी साठले होते.
पूर परिस्थिती कायम
n विदर्भात बुधवारीही पावसाचा जोर कायम असल्याने पूर परिस्थिती कायम होती.
n अकोला जिल्ह्यातील पूर्णा नदीला पूर आल्याने जिल्ह्यातील तीन प्रमुख मार्ग बंद होते.
n या मार्गाने प्रवास करणारे ५० ते ६० प्रवासी अडकून पडले होते, तर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
n नद्यांना आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. अगोदरच दुबार, तिबार पेरणी केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
n शासनाने पूर परिस्थितीची पाहणी व सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.