परतीच्या पावसाचा राज्यात धुमाकूळ; पिकांसह मालमत्तेचेही अतोनात नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 03:29 AM2019-10-23T03:29:05+5:302019-10-23T06:11:27+5:30
पुणे, सांगलीत मुसळधार; दुष्काळी लातूरला मात्र दिलासा
मुंबई : गेले तीन दिवस सुरू असलेल्या पावसाने सोमवारी रात्री पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात धुमाकूळ घातला. सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यात पुरात वाहून गेल्याने एकजण बेपत्ता आहे.
सोमवारी मध्यरात्री १२ वाजता सुरू झालेल्या जोरदार पावसाने पुण्याला रात्रभर झोडपून काढले. शहराच्या अनेक भागातील घरात पाणी शिरले. कात्रज आणि लोहगावमध्ये पाऊस झाला. त्यामुळे आंबिल ओढ्याला पाणी आल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले. रात्रभर झालेल्या या पावसाने येरवडा, शांतीनगर, घोरपडी गाव, वानवडी, आझादनगर, बी टी कवडे रोड, पद्मावती, मार्केटयार्ड भागातील घरामध्ये पाणी शिरले होते. रात्रभर झालेल्या या पावसाची पुणे वेधशाळेत ४२.४ मिमी इतकी नोंद झाली आहे़ लोहगाव ५६.४ तर पाषाण ३२ मिमी अशी पावसाची नोंद झाली.
मुसळधार पावसाने सोमवारी कोल्हापूर व सांगलीला झोडपले. रात्री बारानंतर पावसाने पुन्हा रौद्ररूप धारण केले. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुराच्या तडाख्यातून जी काही पिके वाचली, ती परतीच्या पावसाने आपल्या कवेत घेतली. काढणीला आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत.
अर्ध्या मराठवाड्याला फटका; एक जण वाहून गेला
परतीच्या पावसाने मराठवाड्यात भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार असली तरी हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, कापूस, ज्वारी, बाजरी अशा बहरलेल्या खरीप पिकांचे वाटोळे करून बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेला. नांदेड जिल्ह्यात मुक्रमाबाद येथे पुरामुळे एक दुचाकीस्वार पुलावरील पुरात वाहून गेला. बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यात अतिवृष्टी झाली. औरंगाबाद शहर व जिल्ह्याच्या काही भागांत मंगळवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. हिंगोली व जालना जिल्ह्यातही शनिवार व रविवारी विजांच्या कडकडाटांसह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान
केले आहे.
सांगलीत पाचशे घरांत पाणी शिरले
सांगली शहरात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर कुपवाड फाटा, वानलेसवाडी, शिंदेमळा, टिंबर एरिया परिसरातील पावसाळी वाहिन्या, नाले तुंबून पाचशे ते सहाशे घरांमध्ये पाणी शिरले. रात्रीच्या सुमारास घरात पाणी आल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. नागरिकांनी गणेश मंदिराची भिंत फोडून पाण्याला वाट करून दिली. सातारा जिल्ह्यातील आदर्की, बिबी, सासवड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. घाडगेवाडी, बिबी, सासवड मार्गावरील ओढ्याला पूर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात गेले चार दिवस पावसाचे वातावरण आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सोलापूरमध्ये तलाव फुटला
सोलापूर जिल्ह्यालाही पावसाने झोडपले असून लाडोळे (ता. बार्शी) येथील पाझर तलाव फुटून जवळपास ८० एकरांवरील पिके पाण्यात वाहून गेली आहेत. या भागातील नागझरी व भोगावती नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. अनेक वर्षांनंतर नद्यांना पूर आला आहे. उजनी ३० हजार क्युसेक व वीर धरणातून ५० हजार क्युसेकचा विसर्ग सोडल्याने भीमा नदीलाही पूर आला आहे.
खान्देशात अवकाळी पावसाची संततधार
खान्देशात जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसºया दिवशी अवकाळी संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे कापसासह, ज्वारी, बाजरी, मका या पिकांचे नुकसान झाले आहे.
लातूरच्या पाणीटंचाईचे संकट दूर होणार
परतीच्या पावसाने लातूरकरांना दिलासा दिला असून, पाणीटंचाईचे संकट तूर्त दूर झाले आहे़ रविवारी झालेल्या पावसामुळे शहरालगत असलेल्या साई आणि नागझरी बॅरेजेसमध्ये एकूण ६़९६ तर मांजरा प्रकल्पात १४़४० दलघमी पाणीसाठा झाला आहे़ यामुळे एप्रिल-मे महिन्यापर्यंत खात्रीशीर पाणीपुरवठ्याची सोय झाली आहे़
दिवाळीतही पाऊस पडण्याचा अंदाज
मुंबई : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. महत्त्वाचे म्हणजे हवामानातील बदलामुळे २४ आॅक्टोबर रोजीही पावसाची शक्यता असून, याच दिवशी विधानसभेचा निकाल आहे. त्यानंतर दिवाळीतही पाऊस कायम राहणार आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. २३ आणि २४ आॅक्टोबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २५ आॅक्टोबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.
पुणे, नाशिकमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस
पुणे आणि नाशिक शहरांत चांगला पाऊस नोंदविण्यात आला आहे. पुण्यात आॅक्टोबरच्या सरासरीत ७८ मिमी पावसाच्या तुलनेत १९८ मिमी म्हणजेच जवळपास दुपटीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये आतापर्यंत सरासरी ६३ मिमी पावसाच्या तुलनेत ९८ मिमी पाऊस झाला आहे, असे स्कायमेटचे निरीक्षण आहे.
२३ आॅक्टोबरला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़ महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे़
२४ आॅक्टोबरला कोकण, गोव्या तुरळक ठिकाणी जोदार पाऊस तर, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़ २५ रोजी कोकण, विदर्भ, गोव्यात काही ठिकाणी जोदार पावसाची शक्यता आहे़
पालघर, ठाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात
२३ ते २६ आॅक्टोबर दरम्यान मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे़ मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी चार दिवस पाऊस राहील़ अहमदनगर, पुणे, कोल्हापूर व सोेलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे़ बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी २३ रोजी मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़ औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूरसह बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे़