Join us

लोकनृत्य ते हिपहॉप, फ्री स्टाईल व्हाया ‘नवरात्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 2:57 AM

बॉलीवूडच्या गाण्यांवर तरुणाई थिरकणार : नृत्य शिकण्यासाठी शिबिर, क्लासकडे गरबाप्रेमींची धावाधाव

कुलदीप घायवट 

मुंबई : नवरात्री म्हटले की, नऊ दिवस जल्लोष आणि प्रचंड उत्साह, सलग २ ते ३ तास गरबा, दांडिया खेळणे, यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी असणे आवश्यक आहे. अनेक गरबाप्रेमी एक महिना आधीपासून खास शैलीतला गरबा आणि दांडिया शिकत आहेत. नवरात्रीमध्ये सर्वांचा हटके गरबा आणि दांडिया खेळण्याकडे कल आहे. यामुळे पारंपरिक रास गरबा ते हिप हॉप आणि फ्री स्टाईलमध्ये गरबा शिकण्याकडे तरुणाईचा कल आहे. विशेष म्हणजे, बॉलीवूडच्या गाण्यांच्या तालावर थिरकण्यासाठी विशिष्ट ‘स्टेप’ शिकण्यासाठी तरुणाई आग्रही आहे.

नवरात्रीला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिल्याने तरुणाईचा उत्साह गगनात मावेनासा झाला आहे. नऊ दिवसांमध्ये रास दांडिया खेळण्यासाठी नृत्यदिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली नृत्याचे धडे गिरविले जात आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकनृत्यआणि पारंपरिक गरब्यापेक्षा पाश्चिमात्य हिप हॉप, फ्री स्टाईल असे नृत्य शैलीचे प्रकार वापरून गरबा शिकण्यावर तरुणाईचा भर आहे. यामुळे गरब्यात नावीन्यत: आणण्यासह आधुनिकतेला पारंपरिक शृंगाराने सजविण्यात येत आहे, असे नृत्य दिग्दर्शक गिरीश सोलंकी यांनी सांगितले.लोकांची आवड, वागणे, राहणीमान बदलत असते. त्यानुसार, नृत्यशैलीमध्ये बदल होतो. हिप हॉप, फ्री स्टाईल यासारख्या नृत्यशैलीतून गरबा शिकण्यावर तरुणाईचा कल आहे. हे करताना पारंपरिक गरबा शैलीला धक्का लावला जात नाही. यामुळे आधुनिक होत असताना परंपरा जपली जात आहे. कचुको, ज्युडीओ, रंगत, पोपट, रास गरबा, सुरती गरबा, वेस्टर्न सालसा असे प्रकार यंदाच्या गरब्यामध्ये ट्रेडिंगमध्ये असल्याचे नृत्यदिग्दर्शक सोलंकी यांनी सांगितले.गरबा डान्समध्ये नावीन्य...नृत्यदिग्दर्शिका धनश्री ढोमसे यांनी सांगितले की, यंदा गरब्यात मोठ्या प्रमाणावर बॉलीवूडची गाणी वाजतील. नवीन चित्रपटांची गाणी नऊ दिवसांत तुफान वाजतील. गरबा डान्समध्ये नावीन्य आले आहे, ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीत तोच-तोचपणा असण्याऐवजी अपडेट होणे आवश्यक आहे. या नवीन डान्स प्रकारातून आपला मूळ डान्सप्रकार दूर जात नाही. उलट तो अधिक आकर्षित होतो.

टॅग्स :मुंबई