मुंबई : राज्यात सध्या विविध व्यवसायिक आणि बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून, मागासवर्गीय विद्यार्थी, कर्मचारी, अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र प्रवेशाच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, विहित मुदतीत अनेकदा विद्यार्थ्यांना पाठपुरावा करूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने, त्यांना प्रवेश घेता येत नाही, तर काहींना खुल्या गटातून प्रवेश घ्यावा लागतो. हे लक्षात घेता जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलनेही यंदा पाठपुरावा केला असून, विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यावर सीईटी सेलकडूनही अशा विद्यार्थ्यांची यादी बार्टीकडे पाठविण्यात आली. सीईटी सेलकडून गेलेल्या यादीमुळे अनेक विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रे मुदतीत मिळण्यास मदत झाली.
आर्किटेक्चर, एमसीए, एमफार्मा, एमबीए, कृषी, अभियांत्रिकी, मेडिकल, हॉटेल मॅनेजमेंट अशा अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे तब्ब्ल २० हजारांहून अधिक अर्ज सीईटी सेलने बार्टीकडे पाठविले आहेत. या अभ्यासक्रमाचे सर्वात जास्त अर्ज नागपूर, अहमदनगर, नंदुरबार, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांतून प्राप्त झाले होते. तर, मुंबईतून १८९ तर मुंबई उपनगर जिल्ह्यांतून या अभ्यासक्रमासाठी २५९ अर्ज पुढे पाठविण्यता आल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले. ठाण्यातून आलेल्या अर्जांची संख्या ३९५ इतकी होती. मेडिकल अभ्यासक्रमासाठी ६,७६०, अभियांत्रिकीची ३,९३४, कृषीसाठी १,४५७ तर फार्मसीसाठी २,८७३ विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केले असल्याची माहिती सीईटी सेलने दिली.प्रमाणपत्रे मुदतीत मिळण्यासाठी प्रयत्नजात प्रमाणपत्र प्रवेशाच्यावेळी आवश्यक असल्याने, ते विहित मुदतीत मिळणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी आवश्यक आणि महत्त्वाचे आहे, अन्यथा विद्यार्थ्याला खुल्या गटातून प्रवेश घ्यावा लागू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रे विहित मुदतीत मिळावीत, यासाठी आमच्याकडून करण्यात आलेला हा प्रयत्न आहे.- आनंद रायते, आयुक्त सीईटी सेल