Join us

शिस्त पाळा; अन्यथा पुनश्च लॉकडाऊन - मुख्यमंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 8:31 AM

आपण सगळे व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. अद्याप शहर बस वाहतूक, रेल्वे आपण सुरू केलेली नाही.

मुंबई : महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठविण्याचे काम सुरू झाले आहे. सर्व व्यवहार पुन्हा नव्याने सुरू करण्याची ही संधी आहे. मात्र, जनतेने संयम दाखवला नाही आणि निष्कारण गर्दी करणे सुरू केले, तर नाइलाजाने यापेक्षा कठोर लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू असून, काही अटी घालून त्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. कोरोनाशी लढताना अर्थचक्र बंद पडून चालणार नाही, हे लक्षात घेऊन ही शिथिलता देण्यात आली आहे. सुरक्षित अंतर ठेवून अतिशय सावधपणे काम करावे लागणार आहे.सकाळी ५ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मोकळ्या मैदानांमध्ये वावरण्यास मुभा दिली आहे; परंतु पहिल्याच दिवशी लोकांची झुंबड उडाल्याचे चित्र दिसले. व्यायाम करून तंदुरुस्त राहता यावे यासाठी सरकारने ही सवलत दिली आहे. स्वत:चे आणि इतरांचेही आरोग्य बिघडविण्यासाठी ही सवलत दिलेली नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी निक्षून सांगितले.

आपण सगळे व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. अद्याप शहर बस वाहतूक, रेल्वे आपण सुरू केलेली नाही. कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत; पण जर लोकांनी विनाकारण गर्दी केली आणि त्यातून बाधा वाढत गेली, तर लॉकडाऊन कठोर करावे लागेल. मात्र, महाराष्ट्रातील जनतेवर आपला विश्वास असून, तशी वेळ येणार नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी विशेष मदतचक्रीवादळानंतर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागात २०० कोटींची मदत जाहीर केली आहे. या भागात अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. तेथे लाईट नसल्याने लोकांना पाच लिटर रॉकेल आणि तांदूळ मोफत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. वादळात पत्रे असणारी घरे उडाली, कौलारू घरांचे तुलनेने कमी नुकसान झाले आहे. येत्या काळात मदतीचे निकष बदलण्याची गरज आहे.कोकणातील पत्र्याची घरे पडलेल्या लोकांना पक्की सिमेंट काँक्रिटची घरे देण्याविषयी मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, असेही ठाकरे म्हणाले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गरज पडली तर एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून त्यात पुरवणी मागण्या मंजूर केल्या जातील, असे सांगितले.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाकोरोना वायरस बातम्या